कृषी दिन मराठी कविता
दिन सौभाग्याचा! आज कृषी दिन!!
तरी बळी दीन! राहे सदा!!
मातिचा चाकर! राबे रात्रंदिन!!
तरी क्षीण-हीन! सर्वार्थाने!!
विठू नाम मुखी! नित्य गाळी घाम!!
मिळेचना दाम! कष्टाचेही
जगाचा पोशिंदा! राहतो उपाशी!!
खातात तुपाशी! लोक नेते!!
ठेवितो मस्तक! विठू चरणाशी!!
परी त्याची फाशी! टळेचना
सावकार नाडी! नाडी सरकार!
कुणीही कैवार! घेत नाही!!
व्याजावर व्याज! चढतच जाई!!
पूर्ण भरपाई! होईचना!!
कैसा कृषी दिन! करावा साजरा!!
चेहरा हासरा! राहीचना!!
विठूची पंढरी! धाम त्याचे चारी!!
चुकेचना वारी! पंढरीची!!
म्हणतो ‘किरण’! दुःख विसरीन!!
साजरा करीन! कृषी दिन!!
शिवाजी साळुंके, ‘किरण’
हल्ली मुक्काम- नाशिक.