समिक्षा भावमंजिरी
आत्मसंवादाची जाणिव पेरणारी
वैशाली भागवतांची – भावमंजिरी :
समिक्षा /प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३.
माणसाला व्यक्त होण्यासाठी माध्यम लागतं. कधी ते संगीताच्या स्वरूपात, चित्रकलेच्या स्वरूपात, कलेच्या स्वरूपात तर कधी शब्दांच्या स्वरूपात व्यक्त होते. माणसाची शब्दांशी मैत्री झाली म्हणजे तो लिहू लागतो. लिहिण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्याला कविता हीच सर्वात जवळची वाटते. कवितेद्वारे तो व्यक्त होत असतो आणि मुक्त होत असतो. खरंतर, कविता सहज लिहता येत नाही. त्यासाठी प्रतिभा असावी लागते. ती नेहमीच कशी पल्लवीत होईल. स्वतःला अनुभूती स्फूर्ती येईल, हृदयाला काही भिडेल, आनंदाचा कल्लोळ अनुभवाल.
तेव्हाच कविता जन्माला येते. निसर्गाचे रम्य रूप डोळा पाहतो, मन जाणतं. मग ते हृदयाच्या आत जाईल. निसर्गाचे रंग, रुप हृदयावर आपोआप उमटतात.
आत कालवाकालव होते. भावना उचंबळून येतात. ते शब्द रुप घेतात. मग, कविता, ललित, कथा साकार रुपात अवतरीत होतात. प्रतिमा रूपके नसली, तरी तिचं काहीच अडत नाही. अट फक्त एकच, आतून येऊ द्यावी कविता. एकूणच साहित्याबद्दल ही मतं आहेत बडोद्याच्या वैशाली भागवत यांची. नॅशनल इंशुरंस कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका प्रथितयश ब्रांच मॅनेजर, शिक्षणतज्ञ, लेखिका, कवयित्री, व्यवस्थापिका, संपादिका आणि प्रशिक्षिका अश्या विविध भूमिका पार पाडत असतांना त्या साहित्याकडे डोळसपणे बघतात. नव्याने लेखनाच्या क्षेत्रात येवू पाहणाऱ्यांना सजग मार्गदर्शन करतात.
अनुभवांना आतून अनुभूतीचे अंकूर फूटू द्या, असं त्या सांगतात. मनात संघर्ष पेटला, तर बेलाशक आवाज उठवा. पण किल्मिष, गटबाजी, जातीपाती, धर्म, दुसऱ्या धर्माची प्रचंड निंदा यांपासून जरा दूर रहा, असा सावध सल्ला त्या देतात. रोखठोख बोला व आवाज उठवा. साहित्यिकाचा तो अधिकरच आहे. पण, आपल्या अपरिपक्व विचारांनी एकदम आगडोंब उसळणार नाही, याची काळजी घ्यायला त्या सांगतात. यातून त्यांची संयमित वृत्ती प्रकट होते.
सौ वैशाली भागवत यांचा रजत प्रकाशनातर्फे भावमंजिरी हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी कवितेपेक्षा सक्षम प्रभावी माध्यम नाही असे त्यांना वाटतं. या जाणिवेतून त्यांनी आपल्या अनुभवांचे केलेले चिंतन म्हणजे त्यांची कविता आहे. या कवितासंग्रहामध्ये एकूण ७१ कविता असून त्या मुक्त छंद, अभंग ,ओव्या, अष्टाक्षरी, वृत्तबद्ध कवितेच्या अंगाने प्रकट झालेल्या आहेत. या कवितांमधून त्यांनी स्वतःशी आत्मसंवाद साधताना समूहाशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये अध्यात्म, निसर्ग, प्रेम, पाऊस. मनाशी हितगुज, मानवता आणि नात्यांची उकल यांची पेरणी केलेली दिसून येते. त्यांच्या अनेक कवितांना तंत्र-वृत्ताची साथ लाभली असून त्यामुळे ती लयबद्ध झालेली आहे. आपल्या भावना, अनुभव, विचारांचे मंथन करून त्यातून संवेदनशीलतेने व्यक्त होत असताना त्यांनी आपली कविता फुलवली आहे. मंजिरी म्हणजे इवल्याशा नाजूक सुंदर फुलांचा गुच्छ. आंब्याला मोहर येतो. तुळशीला मंजिरी येतात.
त्यातील नाजूक गुच्छ म्हणजे मंजिरी. अश्या मनातील अलवार भावभावनांचा संग्रह म्हणजे भावमंजिरी. अशा कल्पनेतून वैशालीताई यांची कविता संग्रहात संकलित झाली आहे.
संस्कारांच्या परिघातून स्वतंत्र विचार मंथनाची प्रक्रिया सतत सुरू असते. त्याला अनुभवांची जोड मिळाली म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात भावमंजिरी फुलतात. त्यांना सामायिक करावं या उद्देशाने त्यांनी या संग्रहाची निर्मिती केली आहे. आपल्या मनातील एकटेपणासकट समाज मनाचा त्यांनी घेतलेला वेध, हा कागदावर शब्द रूप घेऊन उतरला आणि त्याची कविता झाली. या कवितेला सहअनुभूतीची जाणीव जोडली गेली आहे. कवितेच्या माध्यमातून मोजक्या ओळी, मोजक्या शब्दांमध्ये नेमकेपणाने कसं व्यक्त व्हावं ते त्यांच्या कवितेमधून दिसते.
त्यांची कविता अभ्यास, व्यासंग आणि निष्ठेच्या परिघावर फिरत असताना प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने भारलेली आहे. तिच्यात भावना आहेत. सौंदर्य आहे. बोधात्मकता आहे आणि रंजकता सुद्धा आहे. कधी ती बुद्धिवादाची कास धरते तर कधी सामाजिक जाणीवांची पाठराखण करते. काही कविता त्यांच्या नेहमींच्या आत्मनिरीक्षणातून आलेल्या जाणवतात.
देवाचे दर्शन हे पाषाणाच्या मूर्तीत होत असले तरी तो चराचरात व्यापून उरलेला आहे हे सांगताना त्या म्हणतात.
देव म्हणुनी पाषाणाची,
मूर्तीच असशी तू
चराचराला व्यापून उरला
तो विश्वंभर तू
त्याची अनेक रूप असली आणि अनेकांना तो अनेक रूपात भेटत असला, तरी आपल्याला तो कोणत्या रूपात भेटेल ? ही आज त्यांच्या मनाला लागलेली ओढ आहे.
कोण जाणतो तुझ्या रूपाला
न कळे कोणा तू
मना निरंतर ध्यास असे
हे जीवन व्हावे तू
भगवंताच्या जाणिवेशी एकरूप होत असतानाच त्या प्रेमाने जग जिंकू पाहतात. परंतु, आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडलेला स्वार्थ त्यांना निस्वार्थ प्रेम करू देत नाही. याची खंत त्यांना वाटते. ती त्या सहज व्यक्त करतात.
ठरवलं होतं जगायचं
फक्त प्रेमासाठी
तर स्वार्थाने अडवलेला
मनाचा कोपरा दिसलाच नाही
माणसाच्या स्वार्थी वृत्तीने निसर्गाला ओरबाडून निसर्गावर अन्याय केलेला आहे. प्रचंड वृक्षतोड करून त्यांनी इमारतींचे जंगल उभे केलेले आहे. या जंगलात होणारी घुसमट व्यक्त करताना त्या म्हणतात….
इमारतीच्या जंगलातली
मने किती घुसमटली
चिव चिवणारे पक्षी देती
दुरून त्यांना हाळी
नाजूकशा चिमणीचे चिव चिवणे देखील त्यांना स्वप्नवत वाटायला लागलेले आहे. कारण, माणसाचा कोलाहल इतका वाढलेला आहे की त्यात मन रमत नाही. त्या मनाच्या तुरुंगात आठवणींचे पक्षी शोधत हिंडतात. ही त्यांची कल्पना एकूणच समाजाच्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकते.
कोलाहल इथे सारा
मौनातच रमले कोणी
मन धुंडाळत कां जाते
ते आठवणींचे पक्षी
असं असलं तरी, मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुणीतरी किंचित हसत आहे. त्या हसण्याचे आपल्या श्वासाशी नातं जुळलेलं आहे आणि त्यामुळेच त्या जीवनात चैतन्य भरलेलं आहे. हा आशावाद त्यांच्या मनाला चैतन्य पुरवतो.
गाभाऱ्यातून मनाच्या
कोणीसे हळूच हसले
अंतर श्वासांच्या मधले
मग चैतन्याने भरले
मन जेव्हा आशेने भरून येतं, तेव्हा दाही दिशांना सृजनाचा हुंकार भरलेला आहे असं त्यांना वाटतं. आभाळात दाटलेले काळे मेघ वैभवाचा सडा शिंपतात आणि जीवनाचा मळा फुलून येतो, हे सांगताना त्या म्हणतात.
दिशांनी दहा मुक्त हुंकार येते
मनी आर्तता सोवळी देत जाते
सळा शिंपतो सावळ्या वैभवाचा
फुलारून जातो मळा जीवनाचा
पाऊस हाऊसृष्टीला नवचैतन्य देत असतो. तोच घराघरात, मनामनात आनंद पेरत असतो. हे पेरणं संजीवन करणाऱ्या या ओळी आहेत.
खेळ ऊन पावसाचा
आहे जीवनी अटळ
ऋतू पावसाचा घरी
देतो आनंद निखळ
त्याच्या आगमनाने सृष्टी आनंदी होते. मातीतून सृजनाचे सोहळे सुरू होतात आणि दूर रानात पानातून कोकीळ गातो.
नादावते सृष्टी सारी
गातो कोकीळ पानात
उमलते मातीतून
सृजनाचे नवे गीत
पाऊस मातीत सृजन पेरतो. या सृजनातून बीज अंकुरते आणि त्याला अशेची स्वप्नं पडू लागतात. तीच मानवाला जगण्याची प्रेरणा देतात.
तिच्याच गर्भी बीज अंकुरे
नव आशेचे
स्वप्न लोचनी मानव पाहे
भव्य उद्याचे
माती आणि माय यांची एकमेकांशी नाळ जुडलेली आहे. मातीला पीक प्रिय तसं मातेला लेक प्रिय असते. ती दोन्ही कुळांचा उद्धार करते. म्हणून, आईला तिचा अभिमानच वाटतो हे सांगतांना त्या म्हणतात.
स्वाभिमान आहे माझा
माझी लेक ती गोजिरी
उद्धारील दोन्ही कुळे
प्रेम जिंकून सासरी
मानवी मन हे आपले दुःख सतत कुणाला तरी सांगू पाहतं. त्यासाठी त्याला देव जवळचा वाटतो. म्हणून, तो चराचरात, पाषाणात त्याचा शोध घेत फिरतो. त्याच्याशी संवाद साधतो.
देव कधी ना मला भेटतो
पाषाणामध्ये
तेजाळ तो असतो साऱ्या
चराचरामध्ये
जीवन जगत असताना जीवनातील खाचखळगे, चढ-उतार, संघर्ष यातून पिचलेल्या माणसाला देव भेटला तर तो देवाला काय विनवण्या करेल ? याची कल्पना वैशालीताई यांच्या पुढील ओळीतून येते.
कर्म बंधने जाळण्यास
मी तुलाच विनविते
येरझारीया सुटो जीवाची
अन लाभो मुक्ती
आपलीऊ कर्म बंधने तुटून जावी आणि मुक्ती प्राप्त व्हावी ! हाच माणसाचा अंतिम आटापिटा असतो. संसारामधील व्याधी, व्यथा, दुःख. वेदना विसरण्यासाठी त्याला या जगाच्या येरझारा नकोश्या वाटायला लागतात. तिथ विनवणी तो त्या दयानिधी परमेश्वराकडे करतो.
पेटली धुनी अखंड
चालतो प्रवास हा
देह लेवुनी कशास
यायचे पुन्हा पुन्हा
जीवाची शरीरात पेटलेली एक अखंड धुनी म्हणजे जीवनाचा प्रवास आहे. तो जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत त्याचा ताप भोगणं भागच आहे. ह्या तापापासून या देहाची मुक्ती कर. देहाची आसक्ती सोड असं मागणं त्यांची कविता परमेश्वराकडे करते. आशेचा कवडसा पेरणारी अनुभूती, जन्म-मृत्यूचे सोहळे, ओले चिंब झालेल्या रानातील पहाटेची साथ, जीवनातील प्रीतीरंग, शिशिराचा पदरव, प्रभू दर्शनाची ओढ, गुरुमाऊलीचे दर्शन, त्याची निरपेक्ष आराधना, मानवी मनाचे फुलपाखरू, अधीर नात्यांच्या वाटेवरील जगण्याचे अर्थ, व्यथांचे सोहळे साजरे करणारे मानवी मन, फुलपाखरू आकाशी उडतांनाही जीवनाचे रंग टिपून ते जगण्याचे अर्थ प्रकट करतात हे सांगणारी त्यांची कविता विविध विषयांना गवसणी घालते.
प्रत्येक स्त्री ही तुळशीसारखी घरासाठी मांगल्य आणत असते. तिच्या भावमंजिरी म्हणजे जगण्यातील विविध रंग आहेत. हेच संग्रहाचे मुखपृष्ठ सूचवते. सौ. वैशाली भागवत (९६३८६७६५००) यांचा आत्मसंवादी साहित्य प्रवास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दूरदर्शनवरील गुजरात लिटरेचर फेस्टिवल, बडोदा येथील वांग्मय परिषदेचे काव्यवाचन, गुजरात साहित्य अकादमीला वळसा घालून आलेला आहे. विविध दिवाळी अंक, मासिकांमधून ते सातत्याने लिहीत आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांचा गुजराती अनुवाद झालेला आहे. छत्तीसगड मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या बृहन महाराष्ट्रातील मराठी कविता या पुस्तकासाठी त्यांच्या कवितेची निवड झाली असून ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एम. ए. च्या अभ्यासक्रमाला लागले आहे. बडोदा आकाशवाणीवरून त्यांच्या कथा-कवितांचे प्रसारण झालेले आहे. त्यांच्या या समृध्द साहित्य वाटचालीला आभाळभर शुभेच्छा.!
धन्यवाद – संपादक मा. हेमंत अलोणे आणि देशदूत परिवार
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.
जि. जळगाव. (महाराष्ट्र)
४२५१०५.
(९४२३४९२५९३)