मराठी पाऊसाच्या कवीता
मराठी पाऊसाच्या कवीता
पावसा से बोल
बोल पावसा रे बोल
रिमझिम झिम बोल
मन भाव कविताही
म्हणे तालावर डोल॥धृ॥
तुझ्या बोलाने घुमू दे
दिशा चारही रे गोल
चिंब भिजव माझही
अख्खं गाव एरंडोल॥१॥
झिमझिमलेत तुझे
बघ सारीकडे बोल
माझ्या गावात अजून
नाही जराही रे ओल॥२॥
येऊ देरे तुझे बोल
आम्हासाठी अनमोल
कविताही तुझ्यासाठी
माझ्या झाल्या बहुमोल॥३॥
तुझ्यासाठी संमेलन
नाशिकला भरवलं
रिमझिम संमेलन
नावं त्याला आम्ही दिलं॥४॥
बोलणार तिथेही रे
आम्ही रिमझिम बोल
बोल बोलात घोळवू
माझे खान्देशीचे बोल॥५॥
जरा बरसा ढगांना
नको गांव माझे टाळू
बोलावल्या मी ढगांना
नको वार्या रे पिटाळू
जरा बरसू दे त्यांना
नको गांव माझे टाळू॥धृ॥
बळी म्हणतो ही बघ
किती काळ घाम गाळू
नदी नाल्यांतून पाणी
वाहू देरे झुळूझुळू ॥१॥
खाचा खळगी पाहू दे
जल भरलेलं तळं
माझ्या अंगणी पाहू दे
पुन्हा तुडुंबले जळ॥२॥
परोपरी म्हणूनीया
बोलावले त्या केवळ
किती शब्दांचे उधळू
मोती माणकं पोवळं॥३॥
हात जोडले तुला रे
नको ढगांस पिटाळू
जरा बरसू दे त्यांना
नको गांव माझे टाळू॥४॥
Pingback: पाऊसगाणे - मराठी 1