वेल्लूर किल्ला
वेल्लूर किल्ला
भव्य दिव्य
पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !
वेल्लूर पासून जवळच तिरूमलाईकोडी येथे लक्ष्मी नारायणी मंदिर सुवर्ण मंदिर आहे.
लक्ष्मी नारायणी विष्णू नारायणाची पत्नी आहे. हे मंदिर 40 हेक्टर जमिनीवर स्थित आहे आणि वेल्लोर-आधारित धर्मादाय ट्रस्ट, श्री नारायणी पीठम यांनी बांधले आहे.
याचे प्रमुख अध्यात्मिक नेते श्री शक्ती अम्मा ज्यांना ‘नारायणी अम्मा’ म्हणून ओळखले जातं. सोन्याचे आच्छादन असलेले मंदिर, दिड टन सोन्याचा वापर करून तयार केले आहे. मंदिर कलेमध्ये तज्ञ कारागिरांनी जटिल काम केले आहे. सोन्याच्या पट्ट्या सोन्याच्या फॉइलमध्ये रूपांतरित करणे आणि नंतर तांब्यावर फॉइल बसवणे यासह प्रत्येक नाजूक अवयव तपशील जपला आहे.हे मंदिर पहायला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनिटे मोफत प्रवेश दिला जातो.
इतर वेळेला मात्र हे मंदिर पहायचे असेल तर दीडशे रुपये तिकीट आकारले जाते. मंदिर परिसरात या ठिकाणी मोबाईल फोन येण्यास परवानगी नाही. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे. दर्शन बारी फार लांब आहे. या बारी मधूनच मंदिराला गोल वेढा घालून तेथे जावे लागते.
सुवर्ण मंदिरातील भव्यता राहून डोळ्याचे पारणे फिटले. या मंदिराच्या शेजारीच बालाजी मंदिर आहे, येथे लाडूचा प्रसाद दिला जातो.
तामिळनाडूमधील अनेक मंदिरे सर्वसमावेशक आहेत.

वेल्लोर किल्ल्याचा इतिहास .
वेल्लूर किल्ल्याची मालकी विजयनगरच्या सम्राटांकडून विजापूरच्या सुलतानांकडे , त्यानंतर मराठ्यांकडे , कर्नाटकी नवाबांकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे गेली. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला ताब्यात ठेवला होता.
ब्रिटिश राजवटीत त्यांनी टिपू सुलतानचे कुटुंब आणि श्रीलंकेचे शेवटचे राजे श्री विक्रम राजसिंहा यांना किल्ल्यात कैदी म्हणून ठेवले होते. श्रीरंगारायाच्या विजयनगर राजघराण्याच्या हत्याकांडाचाही तो साक्षीदार आहे .
1650 च्या दशकात, श्रीरंगा रायाने म्हैसूर आणि तंजावर नायकांशी युती करून जिंजी आणि मदुराईवर हल्ला करण्यासाठी दक्षिणेकडे कूच केले.त्यांनी जिंजी चा किल्ला ताब्यात घेतला, परंतु मदुराईच्या थिरुमलाई नायकाने उत्तरेकडून वेल्लोरवर हल्ला करून श्रीरंगा राया चे लक्ष वळवण्यासाठी विजापूरच्या सुलतानाला विनंती केली .
विजापूरच्या सुलतानाने तातडीने मोठी फौज पाठवून वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर, मदुराई-विजापूरच्या दोन्ही सैन्याने वेल्लोर-तंजावर सैन्याचा पराभव करून जिंजीवर एकत्र आले. युद्धानंतर दोन्ही किल्ले विजापूरच्या सुलतानाच्या ताब्यात गेले. या पराभवाने विजयनगर सम्राटांच्या शेवटच्या थेट पंक्तीचाही अंत झाला.
या घटनेनंतर 20 वर्षांच्या आत मराठ्यांनी विजापूर सुलतानांकडून किल्ला ताब्यात घेतला.
1676 मध्ये मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी तंजावर देशाकडे दक्षिणेकडे कूच केले.
त्याच वर्षी, छ शिवाजी महाराजांचे भाऊ एकोजी यांनी तंजावरचा ताबा घेतला, परंतु त्यांना शेजारी असलेल्या मदुराई आणि विजापूर सुलतान धोका होता , ते अनुक्रमे जिंजी आणि वेल्लोर येथे होते.शिवाजी महाराजांच्या सैन्याने 1677 मध्ये प्रथम जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला,परंतु वेल्लोरवर हल्ला करण्याचे काम त्यांच्या सहाय्यकाकडे सोपवले आणि मुघल सम्राट औरंगजेबचा प्रदेशावर हल्ला होत असल्याने ते दख्खनकडे गेले.

1678 मध्ये, प्रदीर्घ चौदा महिन्यांच्या वेढयानंतर, किल्लासदर मराठ्यांच्या ताब्यात गेला शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधीने गडाची तटबंदी मजबूत केली आणि त्या किल्ल्यावर १६७८-१७०७ या कालावधीत शांततेत राज्य केले.
मराठा साम्राज्याचा प्रतीक असलेलं वेल्लोर किल्ला. हा किल्ला सद्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या किल्ल्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केले जात आहे. किल्ल्याच्या बाहेर समोरच भव्य गार्डन तयार करण्यात आलेले आहे.किल्ल्याच्या तटबंदी भक्कम आहेत ,तटबंदी समोर मोठा खंदक असून त्यामध्ये पाणी वाहते .

किल्ल्यावर टिपू सुलतानचा महाल आहे, भव्य मशिद आहे, भव्य सेंट जॉर्ज चर्च आहे आणि त्याहून डोळे दिपवणारे जलकंठेश्वरर मंदीर आहे.हे जलकंटेश्वर मंदिर त्याच्या भव्य कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे.जलकंठेश्वर विजयानगर वास्तुशैलीतील भव्य मंदिर असून त्याच्या मंडपातील तीरशिल्पात देव-देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नृत्यमग्न असलेल्या पार्वतीची त्रिभंगातील मूर्ती लक्षवेधक आहे.
किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे.
पूर्वेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सद्या किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये असून येथील खंदकातील पाण्यावर मत्स्यसंशोधन केंद्र आहे.
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला होता याचा इतिहास मात्र या ठिकाणी कुठेही लेखी स्वरूपात पहायला मिळत नाही.
ज्याप्रमाणे आग्रा किल्ल्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून स्वतःची सुटका केली होती याची माहिती दिली जात नाही. वेल्लूर किल्ला परिसर भव्य आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे.
