Lohagad लोहगड किल्ला
Lohagad लोहगड किल्ला
चला जाऊया गड-किल्ल्यांवर
लोहगड किल्ला (भाग-०३)
नानाभाऊ माळी
उंच उभट बुरुज हा
धमणीत दम भरतो
जिंकूनी पायऱ्यांनां
कातळ पाषाण हरतो.!
उंच पर्वतावरी उभा
विशाल ढाल किल्ला
चौफेर स्पर्शूनी अंगी
वाराही घेतो सल्ला..!
झाले खडा मिठाचा
भूमीत दडले नारद
आलेत तुफान किती
झालीतं येथे गारद…!
गेलीत शतकं निघूनी
दडल्या स्मृती अजुनी
देईल इतिहास ग्वाही
पुढे वर्षानुवर्षे मोजूनी.!
सह्याद्री ताठ छाती
संदेश देतसे किल्ला
फडकतोय शिखरावर
भगवा थोपवूनी हल्ला!
छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला ‘लोहगड’ किल्ला शौर्याची ग्वाही देत उभा आहे!आकाशाला गवसणी घालणारा हा किल्ला पराक्रमाची ग्वाही देत उभा आहे!अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे!आम्ही ०२ जून २०२४ रविवारी किल्ला पहायला गेलो होतो!सकाळी ०९ तें संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत उघडा असून,पुणे लोणावळा मार्गांवरील मळवली स्टेशन पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले विसापूर,तिकोना, तुंग अन लोहगड किल्ले सह्याद्री पर्वत रांगेत एकमेकांच्या जवळपासचं आहेत!आम्ही मात्र पौडरोड मार्गे गेलो होतो!कमी गर्दीचा मार्ग निवडला होता!
तर… लोहगडाची एक एक पायरी चढत होतो!किल्ल्याला गणेश, नारायण, हनुमान असे महाद्वार आहेत!गणेश दरवाज्यावर प्रचंड मोठे,अनकुचिदार खिळे ठोकलेले दिसलें!दरवाजा जबरदस्त मजबूत होतें!शेजारीचं देवळी आहे!हा किल्ला ७०० वर्षांपूर्वीचा असावा नंतर मलिक अंबर राज्य करीत होता!
त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला होता!मिर्जाराजे जयसिंग यांच्या मध्यस्तीने झालेल्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला औरंगजेबकडे गेला!पण अवघ्या पाच वर्षांत पुन्हा लोहगड किल्ला जिंकून स्वराज्यात घेतला होता!
तर….गणेश दरवाजा पार करून आत गेलो!आत एक खोली दिसली!त्यात कदाचित दारुगोळा ठेवण्याचं कोठार असावं!आतल्या बाजूस छोटीशी गुहा देखील दिसली होती!दगड चुन्यात भक्कम बुरुज अन तटबंदी बांधलेली दिसतं होती!त्यावर मान वाकवून खाली जमिनीकडे लक्ष केंद्रित केले असता चौकोनी बोगदे दिसलें!
कदाचित त्या छिद्रातून शत्रूवर मारा करण्यासाठी तोफ गोळ्यांचा वापर करीत असावेतं!आतल्या अंगाने सपाट जागेवर तोफा ठेवलेल्या दिसतं होत्या!आत अजून गुहा दिसत होती, कदाचित चोर दरवाजा असावा!त्यातून बाहेर लक्ष ठेवण्यासाठी बाह्य गुप्तद्वार असावं!तेथे काही उत्तम स्थितीत असलेल्या तोफा दिसल्या!त्या तत्कालीन संरक्षक कवच असाव्यात!
आम्ही किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर जात होतो!आश्चर्य वाटेल अशा विस्तृत दगडी पायऱ्या होत्या!डोक्यावरून मागे खाली टोपी पडेल अशी मान वरती करून पाहिले असता किल्ल्याचा उभट बुरुज अंगावर येत असल्याचीं भीतीही वाटत होती! भक्कम,मजबूत बांधकाम असलेला बुरुज कदाचित आम्हाला चिडवत असावा!पायऱ्यावरून वेड्या वाकड्या मार्गाने वर चढत असतांना समोर महादरवाजा दिसला!
अतिभव्य दरवाजा प्राचीन वास्तुकलेच उत्तम उदाहरण होत!अजून पुढे गेल्यावर नारायण दरवाजा दिसला!तेथे एक धान्य कोठार सारखे भव्य दिव्य भुयारी भाग जाणवत होता!कदाचित लक्ष्मी कोठी असावी!छत्रपती शिवारायांनी सुरतची लूट केली होती!तो सर्व खजिना याचं लक्ष्मी कोठीत ठेवल्याचीं नोंद असल्याचे दिसते!
पुढे वरती चढतांना दरवाज्याच्या दोन्हीबाजूच्या दगडात हनुमाचीं मूर्ती कोरलेली दिसली!दरवाजा अतिशय भव्य दिव्य होता!हाच हनुमान दरवाजा होता!अतिशय उंच,विशाल, भव्य दिव्य हनुमान दरवाजा प्रचंड मोठया दगडात बांधलेला होता!
बुरुजाच्या आतील बाजूस शिलालेख ही दिसला!लोहगड स्वराज्यासाठी अतिशय महत्वपूर्ण किल्ला होता!सुरक्षा अन राज्य कारभाराच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजाविलेला लोहगड किल्ला अनेक किल्ल्यांच्या परिघातील महत्वपूर्ण समजला जातो!
थेट तटबंदी पर्यंत प्रचंड झाडांनी वेढलेला हा किल्ला शक्ती, युक्ती, सामर्थ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण किल्ला होता!असा हा किल्ला स्वराज्याची शान होता!वैभवी प्रतिष्ठेचा लोहगड किल्ला इतिहासातील पानांवर ठळक उठून दिसतो!
(लोहगड किल्ल्याचा अपूर्ण भाग-०४ मध्ये पुन्हा पाहू!)
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०५ जून २०२४
लोहगड किल्ला (भाग-०४)
चला जाऊया गड-किल्ल्यांवर
लोहगड किल्ला (भाग-०४)
नानाभाऊ माळी
अनेक दुर्ग किल्ले
‘उभट कडे’ खांद्यावर घेऊन उभे आहेत!अंगावर घेऊन उभे आहेत!कित्येक शतकांपासून उभे आहेत! अनेक वादळानां तोंड देत उभे आहेत!आपलं अस्तित्व जपून उभे आहेत!खाली खोल खोल दरी दिसत असतें!खोल दरी प्रचंड जंगलांनी वेढलेली दिसतें!
खोल दरीतून तुफान वारा वाहात असतो!गुंग गुंग आवाज करीत किल्ल्यावर येऊन धडकत असतो!कधी हृदयाला धडकी भरत असतें! निसर्गाचां उपजत कलाविष्कार पाहात राहावंसं वाटतं!किल्ल्याचे उभट कडे वारा,वादळ,पावसाला तोंड देत उभा असतात!’कडा’…किल्ल्याचा दागिना असतो!डोक्यावरील सुंदर गोंदन असतं!..’लोहगड किल्ला’ असाच सुंदर दागिना घालून शतकानुशतके उभा आहे!
होय!लोहगडावर विंचू कडा आहे!विंचूच्या आकाराचा प्रचंड उभट कडा आहे!नजरेच्या पलीकडे त्याची लांबी आहे!विंचू कड्यावर जाऊन जीवंत अनुभव घेण्याचा आनंद वेगळाच आहे!अरुंद रुंदी, खोल झाडांची केसाळलेली दरी,अंगावर शहारे येतील असं दृश्य पाहून लोहगडाचा विंचू कडा साहसाला आमंत्रण देत असतो!
डोळ्यांची अतृप्ती मनाला बेचैन करीत असतें!कड्यावर उभे राहून खाली खोल खोल दरीतं पाहिल्यावर आपल्या धाडसाचीं वाह वाह होत राहते!आमच्याही छातीत धडकी भरली होती!समोर श्वास रोखून पाहात होतो!डोळे विस्फारून पाहात होतो!
निसर्ग आपल्याचं नादात होता!विंचू कडा आपल्याचं खेळात होता!लोहगड किल्ला असा महत्वपूर्ण दागिना घालून सह्याद्री पर्वत रांगेतं स्वाभिमानाने उभा आहे!विंचू कडा लोहगडाचा मुकुट मनी असल्याचं सिद्ध होत आहे!म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपल्या दूरदृष्टीतून या किल्ल्याला महत्व दिले होतें!आम्ही लोहगडाच्या शिखरावर होतो!अजब सपाट भूमीवर होतो!निसर्गाच्या दानासं डोळे भरून पाहात होतो!
आम्ही ०२ जून २०२४ रोजी लोहगड किल्ला चढत होतो!विस्तीर्ण,मजबूत दगडी पायऱ्या चढत होतो!कडे कडेने बुरुज उभे होतें!लक्ष्मी कोठी,गणेश दरवाजा,त्र्यंबक तलाव, घोड्यांची पागा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा पाहात होतो!अनेक तोफा होत्या!पाण्याचें टाके होतें!भक्कम बुरुज पाहात वर चढत होतो!
माणसाने सह्याद्रीच्या उंच डोंगरावर बांधलेला अद्वितीय चमत्कार पाहात होतो!बुद्धी पलीकडे असणार आश्चर्य पाहात होतो!अविश्वासनिय चमत्कार पाहात होतो!एक एक पावलं टाकतांना दम लागत होता!घाम येत होता!आतली जिद्द पुढे ढकलीत होती!
इतक्या उंचावर, दगड-चुण्यात हा किल्ला कसा बांधला असावा? तोंडात बोट घालून मानवनिर्मित आश्चर्याला नमन करीत होतो!वास्तुशास्त्री विश्वकर्माला नमन करीत होतो!
एक एक पायऱ्या वर चढत, भक्कम दरवाज्यातून किल्ल्यावर पोहचलो होतो!मोकळा श्वास घेतल्याची अनुभूती घेत होतो!आम्ही पठारावर होतो!अवलोकन करीत होतो!घाम निघाल्याच समाधान मिळत होतं!
वरती शुद्ध प्राणवायू होता!उड्या मारीत आमच्या श्वसन यंत्रात शिरकाव करीत होता!वरती निसर्ग नजारा पाहात होतो!किल्ल्यास भक्कम तटबंदी होती!एक एक दगड रचून बुरुज बांधला होता!
वरती पठारावर खोल खोल त्र्यंबक तलाव बांधलेला होता!१६ कोणी तलाव होता!कडक उन्हाळ्यातही मुबलक निळसर-शेवाळी रंगाचं पाणी दिसत होतं!अनेक पाण्याचे टाके होतें!तलाव होतें!
दगडचुन्याने बांधलेले,अजूनही भक्कम स्थितीत असलेले दिसले!वरती पठारावर शिवमंदिर होतं!मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!शिवमंदिरा अलीकडे एक दगडी घुमटाकार वास्तू दिसली!कदाचित दर्गा सदृश्य वास्तू असावी!
डाव्या बाजूला घोड्यांची पागा होती!खोल गुहेसारखी होती!आतून संपूर्ण अंधार दिसत होता!मोबाईल टॉर्चने आतील गडद अंधारात पाहात होतो!वास्तुशिल्पी अतिशय हुशार असावा!गुहेत घोड्यांची पागा कशी? गुहा इतकी मोठी होती की त्यात सहज दोन-एकशे लोकं उभे राहू शकतील!
आतून फिरतांना भीती वाटत होती!न जाने आत बिबटया लपून बसला असावा!ही गुहा घोड्यांची पागा आहे यावर विश्वास बसत नव्हता!कदाचित हिचं लक्ष्मी कोठी असावी,ज्यात सुरतेचा लुटून आणलेला खजिना ठेवला असावा!
किल्ल्यावरील भव्य,विस्तृत पठारावर प्राचीन पडके अवशेष दिसत होतें!आपलं अस्तित्व टिकवून होतें संदेश देत होतें!किल्ल्यावरून पवना अन इंद्रायणी नदी खोरे घनदाट जंगलात एकजीव झालेले दिसत होतें!झाडांनी वेढलेल्या सृष्टीसौंदर्याचा अलोट दान पाहात होतो!
पवना धरणाचा पाणी फुगवटा लांबवर पसरलेला दिसत होता!किल्ल्यावरून तें विहंगम दृश्य टिपतांना डोळ्यांना कसरत करावी लागत होती!किल्ल्याच्या मागील भागात ‘विंचूकडा’ ताठ मानेने उभा असलेला दिसत होता!निसर्ग वास्तूविशारदास कोटी कोटी प्रणाम करीत होतो!
या भु… ला दान देऊनी निर्माता निघून गेला!मानवावरती उपकार ठेऊनी गेला!एक एक दृश्य नजरेतून साठवीत होतो!निसर्गाचा अविश्वसनिय अविष्कार हृदयात बंदिस्त करीत होतो!लोहगड किल्ला निसर्ग अविष्काराचं अन मानव निर्मात्याचं सुंदर दर्शन होतं!
चौफेर दूरवर दृष्टी जात होती!तुंग किल्ला,विसापूर किल्ला,तिकोना किल्ला दिमाखात उभे असल्याचे दिसत होतें!एका बाजूला धरणाचं पाणी, दुसऱ्या बाजूला विंचू कडा, पुढे दूरवर पुणे- मुंबई हायवे दिसत होता!वाहने आगपेटीसारखी छोटी छोटी दिसत होती!आम्ही तल्लीन होऊन एक एक क्षण टिपत होतो!
छत्रपती शिवरायांच्या पाऊल खुणांनी पावन झालेला लोहगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत दिमाखाने उभा दिसला!आमच्या हाती भगवा ध्वज फडकत होता!कडक उन असूनही हलकासा,ऊबदार वारा वाहात होता!आम्ही स्फूर्तीने, अभिमानाने,जाज्वल्य राष्ट्रप्रेमातून,’जय शिवराय!जय भवानी!हरहर महादेव!भारत माता की जय!’
चा नारा देत होतो! ‘चला जाऊया गडकिल्ल्यांवर’ चें मुख्य संयोजक आदरणीय वसंतराव बागुल सरांच्या उत्कृष्ट संयोजनामुळे लोहगड किल्ला ‘साहस सफर’ सफल झाली होती!आम्ही सर्व साहसी मावळे लोहगडाचा विशाल अनुभव हृदयात बांधून परतीच्या सुखद प्रवासाला निघालो होतो!अंतःकरण तृप्तीने न्हाऊन निघालं होतं!
… नानाभाऊ माळी,
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०६ जून २०२४
Pingback: वर्धनगड किल्ला - मराठी