Marathi Language Poetry
Marathi Language Poetry
महत्त्व एका थेंबाचे
महत्त्व- एका थेंबाचे
डोळ्यातून
वाहत आलेल्या
जलधारा
साठवून
ठेवाव्या लागतील
कोरड पडलेल्या
जिभेला
ओलावा देण्यासाठी
आता सुर्य तापतोय
पाण्याची वाफही
शोषून घेतोय
या भूतलावरून
पाण्याच्या थेंबाला
संपवू पहातोय
एक दिवस कोरड पडेल
नदी, नाले, तळे समुद्राला
प्रत्येक जीव तरसतील
पाण्याच्या एका थेंबाला
तडे पडतील भुमीला
जीव सोडतील
एक एक करून
दोष देतील मनुष्य प्राण्याला
म्हणतील
तुझ्या कर्माची फळे
आम्ही भोगली
आता तू ही भोग
आणि साठवून ठेव
पश्चातापाने
तुझ्या डोळ्यातल्या
आसवांचे थेंब
जिभेची कोरड
ओली करण्यासाठी
तुला थेंबाचे महत्त्व
कधी कळलेच नाही
तू वाहत गेला
अविचारात
अहंकारात
थेंबाला जपण्याचा
विचारच केला नाही
शेवटी तुझ्यावर
आपदा आली
तरीही नाही….
कवी:- चंद्रशेखर प्रभाकर कासार
धुळे,7588318543.
![Pavsachi kavita marathi](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/flash-1455285_12807094614667914412079-1024x672.jpg)
चपराक Marathi Language Poetry
चपराक
चपराक मारूनी तो
खुर्चीवर हो बसला
बाता फुकाच्या करोनी
रयतेचा राजा झाला ||१||
ज्ञात नसे त्यास शास्त्र
समाज, निती, अर्थाचे
शासन चालेल कसे
मंत्री बेभरवशाचे ||२||
उधळून लावी डाव
बेबंदशाही शासन
नसे कुणाची हिंमत
मज्जावी ते दुःशासन ||३||
छळवाद रयतेचा
सदा होई राज्यभर
कष्ट करूनही होई
भाकरीची मरमर ||४||
असा राजा नको कधी
सुखी नाही जिथे प्रजा
राजा खातो तूप रोटी
जनतेला मिळे सजा ||५||
कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
७५८८३१८५४३.
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/05/img-20240519-wa00277911083817123657078-730x1024.jpg)
निकाल Marathi Language Poetry
साहेब
उद्या तुमचा निकाल आहे
साहेब
तुम्ही पास होणार
नाहीतर नापास होणार
तुमचं भविष्य उद्याच ठरणार
पास झालाच तर सत्तेच्या खुर्चीवर बसणार
नाही तर विरोधी खुर्चीवर बसणार
पण तुम्ही आमचे साहेब होणार
आमचं एक मत
तुमचं भविष्य ठरवणार
तुमच आयुष्य घडवणार
उद्या तुमचा निकाल लागणार साहेब
तुम्ही म्हणे मोठ्ठ काय ते
मंत्री साहेब होणार
तुम्ही नामधारी होणार
आमदारातून खासदारातून फिरणार
विकासाच्या नावाची स्वप्ने रंगवणार
त्यातच तुमचा पण विकास करणार
आलिशान कार बंगला नोकर चाकर बाऊन्सर
नको नको त्या सुविधा
तुम्हाला मिळणार
तुम्ही विमानत फिरणार
हवेत उडणार
दौऱ्यावर दौरा करणार
विदेश वाऱ्या करणार
मंत्रालयात अधिवेशन गाजवणार
त्यातच तुमचा चंगळवाद होणार
पाच वर्षे अशीच संपणार
तुम्ही मोठे होणार साहेब
आम्ही मात्र आहे तिथेच राहणार
त्याच भाकरीच्या तुकड्यासाठी
काबाडकष्ट करणार
तोच गाव तीच वेशी
तीच गल्ली तेच घर
आमचं सगळ तसच राहणार
एक दिवस तिथेच सरणार
पण साहेब
तुम्ही साहेब झालात म्हणून
तुमच्या आशेवर
घोटभर पाण्यासाठी
चतकोर भाकरीसाठी
आमचं जीवन संपवणार
उद्या तुमचा निकाल आहे साहेब
पाच वर्षे अशीच संपली
तेव्हा तुम्हीच काय
तुमची सावली पण
आमच्याकडे नाही फिरकली
तुमच्या राजकारणाचा
लखोलाभ तुम्हाला साहेब
आमचं काय?
असच चालू राहणार
पाण्यासाठी भटकंती
अन्नासाठी कष्ट
आणि कर्जाचा डोंगर झाला का
फासावर
निकाल लागणार
साहेब
उद्या तुमचा निकाल आहे
तुम्ही पास होणार
आणि आम्ही तुम्हालाच पास करून
नापास होणार
कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
७५८८३१८५४३.
![जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/05/img-20240519-wa00284669860449779579439-809x1024.jpg)
एक जून Marathi Language Poetry
जन्म तारीख १\६ (एक जून )
गरीबाच्या घरात
मुल आले जन्माला
वाढदिवस मात्र
कधीच साजरा नाही झाला
पंचाईत पडली बापाला
जेंव्हा गेला मुलाचं
शाळेत नाव टाकायला
जन्म तारीख सांगता येईना
फक्त म्हणतो ,
मुलगा पाच वर्षाचा झाला
घेऊन आलो शाळेत शिकायला
लिहा की तारीख
पाच वर्षांपूर्वीची
जवळपासची १\६
तेव्हा पासून कागदोपत्री
जन्म तारीख १\६
तसंतर गरीबाचं पोर रोजच मरतं
रोजच पुन्हा
नविन जन्म घेऊन
जगायचं शिक्षण घेतच राहतं
आणि
रोजच दारूच्या गुत्त्यावर
वाढदिवस मनवतं
गरीबाची लाचारी
सरकारला, पैसेवाल्यांना
नाही कळायची
त्यांच्या रोजच्या
मरणाच्या सरणावर
यांची दाळ शिजत असते
गरीबाच्या पोटातली भाकरी
रोजच जळत असते
बाप नाही शिकला
म्हणून पोरगं पण नाही शिकत
संसाराचा रहाट गाडा
ओढण्यात आयुष्य जातं
मात्र,
पोराची जन्म तारीख
नाही आठवत
शाळेत पोराला घालतांना
१\६ आठवते
आणि तीच मग
कागदोपत्री पत्री होते
गरीबाची जन्म तारीख
१\६ असते
शाळेत नाव घालतांना
पाच वर्षा पूर्वीची
पाच वर्षा पुर्वीची.. ……
कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
7588318543.
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/05/img-20240516-wa00385119825752740092533-746x1024.jpg)
जीवन चक्र Marathi Language Poetry
जीवन चक्र
जसे आहात तसेच रहा
त्यातच सुख समाधान आहे
मलाच माझे मन
हे समजावीत आहे
कोण जाणे काय तुझ्या
प्रारब्धात लिहिले आहे
ललाटरेषा सांगत नाही
पुढे काय घडणार आहे
जन्म मृत्यू त्याचेच हाती
मधला काळ तुझाच आहे
तुला कसे जगायचे जीवन
हे तर हातात तुझ्याच आहे
कोण तो कोण ती
ते सगळे तुझेच आहे
सहवास त्यांचा तुला
आनंद जीवना देत आहे
जीवन पटाच्या प्रवासात
चक्र फिरते नित्य आहे
पराधीन मानव जगती
हेच अंतिम सत्य आहे
कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
७५८८३१९५४३.
![आखाजीचे जेवण](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/05/inshot_20240510_1128491657169661959810041574-1024x576.jpg)
अजूनही मी तसाच आहे Marathi Language Poetry
अजूनही मी तसाच आहे
अजूनही मी तसाच आहे
काल जसा होतो आज तसाच आहे
का बदल करावा माझ्या स्वभावात मी
जित्याची खोड मेल्याशिवाय का जात आहे
वागणे माझे पटत नसेल तुम्हाला,
रस्ता बदलायला माझी कुठे मना आहे
कुणी म्हणतो मज भोळाशंकर
कुणी म्हणतात शाम सावळा आहे
नावे ठेवती कितीक मज
मी तर घेतला वसा निराळा आहे
कधीच मी झालो नाही मोठा पैशाने
माझी श्रीमंती माझ्या स्वभावात आहे
आणत नाही मी उसने अवसान
जे आहे ते रोखठोक आहे
राहतो मी रोज माझ्याच मस्तीत
म्हणूनच अजूनही मी तसाच आहे
काल जसा होतो आज तसाच आहे
काल जसा होतो आज तसाच आहे
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
8208667477.
7588318543.
Marathi Language Poetry