होळी आयुष्याची लघूकथा

होळी आयुष्याची
होळी आयुष्याची

होळी आयुष्याची एक लघूकथा

बायजा काकू आणि तात्यांनी आपला वंश वाढावा, घरादाराला कुळाला व कुलधर्माला वारस . .  मिळावा, म्हणून अनेक मोठं, मोठ्या शहरी जाऊन इस्पितळाच्या पायऱ्या झिजवल्या होत्या.
इतकेच नव्हे तर कुणी काही सांगावं! ते ह्यांनी ऐकावं !
देवदेवस्की काय ?नवस सायास पूजापाठ काय ? ऊपवास, काय ? पोथी पारायणं काय ?, जप तप, होम हवणं काय? इतकेच नव्हे तर
अनेक देव तांब्याच्या ताम्हणांत अहोरात्र पाण्यात पालथे घालायला देखिल बायजा काकूने कमी केले नव्हते !

गावकुसाच्या बाहेर शेता बांधाच्या पिंपळावरचा कडेचा मुंजा काय ? राणवा काय म्हसोबा काय ? नदी काठच्या साती आसरा काय ? गुड गुडी वाला बाबा काय ? मदारी काय ?गारुडी काय? एवढ्याने कमी की काय ? मदारीच्या थडग्यावर कित्येक चादरी देखिल ओढल्या होत्या !
सर्वच पूजून झाल्यावर काकूंच्या वयाच्या चाळीशीत कुठे पाळणा झोके घेऊ लागला!

सर्वत्र आनंदी आनंद झाला. कुल दिपकाला लहाणाचं मोठं करून त्याला एम. डी. डॉक्टर करण्यासाठी तात्या काकूंनी आपल्या आयुष्याच्या संपत्तीची विल्हेवाट लाऊन स्वःताच्या आयुष्याची होळी पेटऊन मुलाला एम. डी. पर्यंत नेऊन सोडलं होतं! .

नवसाच्या पोराला एम. डी. डॉक्टर करून, स्वःता मात्र भाऊ बंदकीच्या वाड्यातल्या अळीत भाड्याच्या घरात आयुष्यांच्या संध्याकाळी ओल्या लाकडाच्या चुलीच्या धुराड्यात बायजा काकू आणि तात्या आयुष्याची संध्याकाळ घालवत होते !
कधी नव्हे कुल दिपक, व सुनबाई शहरातून गावी आले होते, ते ही होळीच्या आदल्या दिवशी !

सुनबाई माहेरवासी खेड्यातीलच  गावगाडया कडचीच होती!
परंतू शहरात गेल्यावर फॉरेनच्या तोऱ्यातली झाली होती.
सुनबाईची वेशभूषा, केशभूषा, बोलीभाषा सर्वच बदलले होते ! .


होळीच्या सणाला शहरातून आपली सुन ,मुलगा गावी आल्याचा आनंद बायजा काकू आणि तात्या यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. परंतू मुलाला व सुनेला त्याचे सोयर सुतक नव्हथे !

रात्रीचे आठ वाजायला आले काकू व तात्यांच्या पोटात अन्नाचा कन नव्हथा, मुलगा व सुनबाई दिवसभर गावात बाहेर फिरण्यात मग्न होते.
एकदाची रात्रीची होळी पेटेल मग सर्वच एकत्र जेवायला बसुया या विचारात तात्या व काकू होते.

रात्रीच्या नऊ वाजता कुल दिपक व सुनबाई घरी आले ते बाहेरून जेऊनच !
तात्यांनी मुलाला विचारले होळी पेटली असेल तर आपण सर्वच एकत्र जाऊ दर्शन घेऊ व सर्व एकत्रच जेवायला बसूयात का ?!
दिवसभर चुलीकडे सुनेने ढुंकूनही पाहीले नव्हते. काकूला बरे नव्हते! त्या ही स्थितीत साग्रसंगीन पुरणाचा स्वयपाक आमटी भात करून ठेवला होता.
बाहेरून पोटपुजा करून आलेल्या मुलाने न राहून आपल्या आवाजाची उंची वाढवत तांत्यावरं तुटून पडला !
उभ्या आयुष्यात माझ्या साठी माझ्या बायकोसाठी तुम्ही काय केले ? शेतीवाडी घरदार सर्वच फुकून मोकळे झालात आता भाड्याच्या घरात राहायला काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला ?
उभ्या आयुष्याची संपत्ती तुम्ही, स्वःताच्या मौज मजेसाठी खर्ची घालून तीची होळी पेटवली!
आता काय लोकांच्या पेटवलेल्या होळ्या पाहायला सांगता ?


आणिअचानक मातीच्या चुलीतून … ओल्या लाकडांनी पेट घेतला, अग्नी भडकू लागला, अग्नीच्या धुरातून लालबुंदअग्नीचा जाळ ठिणग्या झाडू लागला, जाळ  चूलीतून बाहेरू पडू लागला, घरातच होळी पेटली होती . . . . . . .

उपाशी पोटी बायजा काकू डोक्यावरील पदराने चुलीतल्या त्या जाळा कडे बघत तर ,होती ! परंतू डोळ्यातील अश्रू घळाघळा पडत होते डोक्यावरचा पदर त्यात चिंब भिजला होता . काकू
मनातल्या मनात वंशाच्या दिव्या साठीच्या केलेल्या  देव देवस्की, नवस सायास, पोथी पारायणं, नव्हे नव्हे मदारीच्या थडग्यावरच्या चादरी किती घातल्या त्या देखिल मोजू लागली  होती ! 
तर तात्या जाड भिंगांचा चष्मा काढत धोतराचा सोगा डोळ्याला लाऊन मुलाच्या शिक्षणात खर्चात घातलेली संपत्ती त्यात गत आयुष्याची झालेली वाताहात,वंशाच्या दिव्याने उभ्या आयुष्याची शब्दांची पेटवलेली होळी त्यात डोळ्यासमोर पेटलेली होळी ! सारं काही आता आठवतं होते!

गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *