श्री अवधूत दत्तपीठ श्री विठ्ठल मंदिर

श्री अवधूत दत्तपीठ श्री विठ्ठल मंदिर

!!श्री अवधूत दत्तपीठ श्री विठ्ठल मंदिर!!

श्री त्रिंबक गणेश गानू हे सन 1944-1945 ह्या वर्षी विलेपार्ले मुंबईहून शेंगदाणा तेल निर्मितीचा कारखाना काढण्यासाठी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील दसेरा  मैदानाजवळ वास्तव्यासाठी आले. तत्पूर्वी मुंबईला त्यांचा मंगलदास मार्केटमध्ये होलसेल कापडाचा मोठा व्यवसाय होता.अनेक अडचणींवर मात करुन सन 1947 ह्या वर्षी शहरातील एक नंबर असलेली अरविंद ऑइल मिल त्यांनी सुरु  केली.

श्री त्रिंबक गानू म्हणजे अत्यंत सात्विक प्रवृत्तीचे, अध्यात्मिक व सचोटीने वागणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत श्री अवधूत दत्तपीठ श्री विठ्ठल मंदिर बांधायचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून श्री विठ्ठल मंदिराची उभारणी झाली. ह्या मंदिराच्या बांधकामासाठी दगडाची मुख्य अडचण होती, मंदिरासाठी दगड कुठून आणावा ?अशी विवंचना त्यांना होती, परंतु धुळ्याजवळ असलेल्या चक्करबर्डी परिसरात अतिशय सुंदर,उपयुक्त अशा दगडांची खाण सापडली. त्यातून फक्त चांगल्या आणि उच्च प्रतीचा पाषाण   पारखूनच त्याचा बांधकामासाठी वापर केला गेला.

हे पाषाण घडविण्यासाठी मंदिर परिसरातच प्रत्यक्ष जागेवर बसूनच दहा ते बारा पाथरवट बांधवांनी दगड घडविले आहेत.ह्या दगडापासून सुबक व आकर्षक असं मंदिराचं बांधकाम धुळे येथील कारागीर श्री शंकर तानाजी मिस्त्री यांनी केलं आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती ही काळ्या  संगमरावरची असून ती मुंबईच्या श्री शिराळकर बंधूंनी घडविली आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव तर अवर्णनीय असून मूर्तीवरील विलोभनीय कोरीव  कामात अंगरखा, कद, तसेच दागिने यावरही बरीच मेहनत घेतलेली ठळकपणे दिसून येते. श्री विठ्ठलाची मूर्ती ही काळ्या पाषाणाच्या ओट्यावर उभी असून ओट्याच्या दर्शनी भागावर सुरेख असं कमळ कोरलेलं आहे. मागील बाजूस मेघडंबरी असं कोरीव काम भविकांचं लक्ष वेधून घेतं.

इतकेच नव्हे तर मंदिराच्या  सौंदर्यात भर टाकण्याचे श्रेय श्री छगन मिस्त्री यांना सुद्धा जातं .त्यांनी आपलं कौशल्य पणाला लावून गरुड, हनुमान, तक्षक, गणपती, कासव, आणि गायमुख यांच्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती घडविल्या आहेत.तसेच मंदिराच्या कळसाच्या खालील कमळही खूपच सुंदर घडविलं आहे.पाषाण  घडवायचं काम खूप अवघड होतं.मंदिराचे सर्व बांधकाम, मूर्तिकला अत्यंत सुबक असून भरभक्कम सुद्धा आहेत. मंदिराची जागा प्रशस्त व  विस्तीर्ण असून संपूर्ण परिसरात जमिनीवर फरशी ऐवजी दगडी बांधकाम केलं आहे.

हे मंदिर म्हणजे वास्तूकलेचं देखणं वैभव आहे. सन 1965 साली मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली अन् जवळपास वर्षभर चाललेलं बांधकाम सन 1966 च्या विजयादशमीला पूर्ण झालं आणि त्याच मुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.

आज हया मंदिरास जवळपास 60 वर्ष पूर्ण होत असली तरी अनेक पावसाळे, उन्हाळे झेलणाऱ्या मंदिरास आजही कोठे एखादा तडा गेलेला नाही अथवा एकही ठिकाणी त्याचा दगडही झिजलेला नाही.उलट पावसाचा स्पर्श झाल्यावर हे मंदिर अधिकच चमकू लागतं.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मंदिर परिसरात एक दिवसीय खूप मोठी यात्रा भरते.त्यावेळी भाविक अतिशय श्रद्धेने दर्शनासाठी येतात आणि विठूमाऊलीचं दर्शन घेतल्यावर नतमस्तक होतात.विठोबाच्या दर्शनाने खूपच समाधान मिळत. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातून अनेक भाविक दर्शनासाठी आवर्जून येत असतात.तसेच वर्षभर सुद्धा भाविकांची वर्दळ सुरू असते.

संदर्भ… कै.त्रिंबक गणेश गानू यांच्या स्नूषा अंजली दिलीप गानू यांनी दिलेल्या माहिती
वर आधारित आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply