विचार माझे लेखणी माझी

विचार माझे लेखणी माझी
विचार माझे लेखणी माझी

विचार माझे लेखणी माझी

विचार माझे  लेखणी माझी

सेवा निवृत्ती नंतरचा काळ हा एक विलक्षण प्रवास

क्षण नाही निरोपाचा
सण आहे शुभेच्छांचा

पाऊल बाहेर पडताना
मन थोडे रेंगळताना

एका डोळ्यात आहे आसू
तर दुसऱ्यात आहे हसू

भूतकाळाच्या आठवणींचा
मनातल्या साठवणींचा

वेध घेता भविष्यकाळाचा
वर्तमानात जगण्याचा

कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आयुष्याची बरीच पाने लिहिली जातात तर कधी कधी काही पाने कोरीच राहतात. एका विशिष्ट क्षणाला आपल्या बरोबर असणाऱ्यांची साथ सेवा निवृत्ती या नावाखाली सोडावी लागते आणि मग चालू होतो एक नवीन विलक्षण प्रवास . ज्यात नावे गडी, नवे सोबती, आणि नव्या नात्यांची होते रेलचेल. पण याक्षणी आठवण असते जुन्या क्षणांची जेथे विसावलेले असते काही आयुष्य आनंदाचे , दुःखाचे , मनाविरुद्ध घडलेल्या घटनांचे, तर काही आवाक्यात नसलेल्या आव्हांनाचे .

अखेर दरमजल करीत नको असणारा तो क्षण येतोच आणि आपल्या सहकाऱ्यांना निरोप देण्याची वेळ येते .ठराविक चाकोरीबद्ध आयुष्याची वाटचाल रेंगाळते आणि मग सुरू होतो तो एक नवीन प्रवास. खरे तर निरोप देणे घेणं हा काही फक्त शिष्टाचार नसतो तर तो असतो आपल्या संस्कृतीचा सहज सुफल असा आविष्कार. या क्षणाची खरे तर कोणी वाट पाहूच नये असे माझे प्रामाणिक मत आहे.

माणसाने आयुष्यात निवृत्त कधीच होऊ नये. पण हा सात्विक सोहळा जेव्हां घडतो तेव्हा कोणाच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या जाऊन नयेत. तर हसतमुखाने याही क्षणांचे स्वागत करायला हवे किंवा नव्या आयुष्याची सुरुवात करताना , नव्या जाणिवेची जबाबदारी, आरोग्यविषयक सल्यांची , नव्या मैत्रीची आणि नव्या नात्यांची वीण अधिक घट्ट कशी होईल या सारख्या शुभेच्छांची आवश्यकता असते.
सेवा निवृत्ती पूर्वीचे दिवस आणि नंतरचे दिवस यात फार मोठा फरक असतो.

सेवेत असताना घराची , कुटुंबाची जबाबदारी ही कायम असते नंतर मात्र ही जबाबदारी कमी होऊन असलेली नाती घट्ट टिकविण्याची आणि कुटुंब एकसंध ठेवण्यासाठीची धडपड असते. जेव्हा आपला आर्थिक स्त्रोत कमी होतो किंवा बंद होतो तेव्हा खरी चालू होते ती आयुष्याची कसरत. जेव्हा शरीर वार्ध्यक्याकडे वाटचाल करत असते तेव्हा चणचण भासते ती आरोग्यविषयक सेवेची, आणि त्यासाठी लागणाऱ्या अर्थ पुरवठ्याची.  सध्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण फक्त आणि फक्त पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतो ते काही चुकीचं नाहीच. कारण आजकाल एकत्र कुटुंब पद्धती विखरून गेली आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे.

याचे फार मोठे दुष्परिणाम आपण पाहतो आहोत परंतु. क्षणिक सुखाच्या वाटेवर मृगळामागे धावताना नात्यांची वीण कधी खुलली गेली हे कोणाच्याही लक्षात आले नाही. याचेच फार मोठे परिणाम सेवा निवृत्तीच्या काळात दिसायला लागलेत. स्वतःची मुले आई वडीलांपासून जेव्हा दूर राहतात तेव्हा सेवा निवृत्तीचा काळ हा अतिशय कठोर असतो. कारणे कोणतीही असतो , मुले नोकरी व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेली असोत किंवा वार्ध्यक्यात एकमेकांच्या विचारांची दिशा बदलेली असो.

परंतु खरी गरज असते त्यावेळी तुमच्या बरोबर असणाऱ्या संगतीची. एकटेपण माणसाला खायला उटते. उतरणीचा काळ, म्हातारपण म्हणजेच दुसरे बालपण हे कधीच विसरता येणार नाही. आई वडिलांच्या कमावत्या वयात आपल्या आयुष्याची दोर बांधलेल्या मुलांना त्यांच्या शेवटच्या काळात गरज लागते ती फक्त सहवासाची आणि त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींची काळजी घेणाऱ्यांची. पण आता हे सर्व काही संपत चालले आहे. दिवस बदलतायेत.

खरे तर सेवा निवृत्ती ही नसते फक्त निवृत्ती तर ती असते नव आयुष्याची आवृत्ती तुमचे हातपाय जो पर्यंत हालचाल करतात तो पर्यंत निवृत्त होऊच नका. मेंदू शरीराला योग्य अशा आज्ञा जोपर्यंत देतोय तो पर्यंत निवृत्त होऊच नका. भूतकाळाच्या आठवणीत जगताना भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात कितीही कष्टदायक वाटला तरी नं थांबता निवृत्ती घेऊच नका.

फक्त चाकोरीबद्ध वाटचाल सोडून जर वेगळ्या वळणावर येऊन आपला नवा प्रवास चालूच ठेवा. शक्यतो शेवटच्या क्षणापर्यंत कोणावर अवलंबून राहायला लागणार नाही याची काळजी घ्या. जमेल तितके स्वतःला व्यस्त करा. दोन पैसे नाही कमाविता आले तरी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्या. शरीर हलते बोलते चालते ठेवा . निवृत्तीनंतरच्या काळात शारिरीक क्षमता जरी कमी झालेली असली तरी ती व्यस्त ठेवा . एका विशिष्ट प्रवाहात स्वतःला कायम झोकून द्यायला शिका.

नव्या संगतीत रंगताना एकमेकांची काळजी घेत जा, मिळालेल्या आयुष्याची राहिलेली काही कोरी पाने पुन्हा भरता येतात का ते पहा. शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्य भरभरून आणि एकमेकावर प्रेम करून जगा. हे आयुष्य खूप सुंदर आहे याचा मनमुराद आस्वाद घ्या आणि सेवा निवृत्ती नंतरचा पर्व काळ म्हातारपण म्हणून न स्वीकारता, वार्धक्य म्हणून न स्वीकारता एक आक्रमक आयुष्य म्हणूनच जगा नक्कीच ही सुखावह  वाटचाल यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही याची खात्री आहे.

बाबाजी हुले , नवी मुंबई

विचार माझे लेखणी माझी
विचार माझे लेखणी माझी