लालपरी
लालपरी
लालपरी नंदुरबार-पुणे (भाग-०१)
Table of Contents
(भाग-०१)
नानाभाऊ माळी
जीवंत अनुभव कधी आनंद देत असतात!कधी अग्नीदाहकही असतात!अनुभव अनेक प्रसंगाची शिदोरी वाढवीत असतो!आपण त्यांना समृद्ध साठा म्हणूयातं,भंडार म्हणूयात!अनुभूतीचं भंडारदृश्य कथित होत जातं!अंतरी विसावतं जातं!प्रवास कितीही नकोसा वाटला तरी ‘काही कारणे’ प्रवास होतंच असतो! सुख-दुःख सांभाळण्यासाठी, हौस, आनंदासाठी प्रवास करावाचं लागतो!अनेक वाहनातून प्रवास सुरूचं असतो!लालपरी एसटीचा प्रवास तर अगणित अनुभवांचा अनमोल खजिना असतो!एसटीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचां भिन्न अनुभव सोबत असतो!बसच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवल्यापासून प्रसंग चित्रण सुरू होऊन जात!आपलें संवेदनशील स्पर्शअवयव.. डोळे, तोंड, कान,नाक जागृत होऊन चाणाक्ष होऊन जातात!भिरभीर होतात!प्रसंगानुरूप कार्य सुरू होऊन जातं!चढणारा समूह भिन्न भिन्न असतो!
उतरणाऱ्या प्रवाशांची एकी असते तशी झूबंडं करुन एसटीत आत घुसणाऱ्यांची देखील एकी असते!चढण्या उतरण्यातील संवाद मजेशीर असतो!टोकाटोकी, ढकला ढकली,रिटारेटी,ओढाओढीचां खेळ प्रचंड वेगाने सुरू होतो!उतरणारा इतका घाईतं नसतो!टंगळमंगळ करीत खाली उतरण्यासाठी पुढे सरकत असतो!चढणारा मात्र रेसचा उधळलेला घोडा असतो!काहीही करुन सीट मिळावं जरा जास्तचं आक्रमक असतो!ओढातानीत एसटीचा कुठलाही भाग हाती आला की धडशा मारीत वर चढत राहायचं!अशा झुंबडं गर्दीत,कचाट्यात एखादा नाजूक देह यष्टीचां प्रवाशी सापडला की त्याचा चोळामोळा होतोचं!व्यक्ती हाती दरवाजा पकडू दे,सिटचा लोखंडी भक्कम बार पकडू दे, आक्रमक पशु धावत जाऊन भक्षावर झडप घालावी तसा व्यक्ती सीटवर ताबा मिळवत असतो!
धडधाकडं, तरणीताठी मुलं-तरुण, भांडखोर, धसमुसडे प्रवाशी असतील तर सीटवर पटकन झडप घालतो!कब्जा मिळवतो!एकदा सीटवर बसला कि सुस्कारा सोडीत पशुतून माणसात येऊ लागतो!इतरांकडे पाहात, सुस्कारा सोडीत मनातल्या मनात म्हणत असेल,आता चिंता मिटली बुवा गाव येईपर्यंत!’ तो हायस करीत निःश्वास सोडतो!या झोबांझोबिंचीं अनुभूती खूप काही शिकवून जातं असते!एसटी बस प्रवाशांच्या सुख-दुःखाचं माध्यम होऊन जाते!प्रवाशी एसटीत समरस होऊन जातो!
माझा सध्या प्रवासाचे जास्त योग येत आहेत!एसटीत मी नेहमीचं प्रवास करीत असतो!लालपरी,एसटी मला हृदयाहून प्रिय वाटत आली आहें!खरंय,एसटी आमच्या हक्काची, माझीचं वाटतें!अशा या लालपरीने दिनांक २० जून २०२५ रोजी नंदुरबारहून पुण्याला यायला निघालो होतो!दुपारी १२-३० ला नंदुरबारहून ‘नंदुरबार-पुणे एसटी’ लागलीं होती!ड्रायवर एसटी स्टॅंडमध्ये ठरलेल्या ठिकाणी बस लावण्यात दंग होता!प्रवाशांनी ‘नंदुरबार-पुणे’ बस पाहिल्या बरोबर मधमाशांचं मोहोळ उठावं तस प्रवाशांचं मोहोळ उठलं होतं!जीवाचा आटापिटा करीत बसमागे पळत सुटले होते!प्रवाशी सीट पकडण्यासाठी धडपडत होते!काहींजन उघड्या खिडक्यातून आपल्या बॅगा, हातरूमाल, पिशव्या आत फेकत होते!काहीजन दरवाज्यातूनचं रिटारेटी करीत,धडशा मारीत आत घुसण्याचा प्रयत्न करीत होते!सीट मिळविण्यासाठी झुंबडं सुरू होती!प्रत्येकाला वाटतं असतं ‘बसायला जागा मिळेल!’ प्रवाशी संख्या जास्त असते!सीटं कमी असतात!सरळमार्गी प्रवाशी उभे राहायला जागा मिळाली तरी समाधानी असतात!
मी आजपर्यंत कधीही इतका स्वार्थी झालो नव्हतो!त्या दिवशी ‘कलीनें’ माझ्यावर काहीतरी जादू केली होती! मलाही कळलं नव्हतं!मी धूर्त होतं पाठगोळी मारलेली सॅक काढली अन सरळ खिडकीतून आत फेकून दिली होती!फेकली म्हणण्या पेक्षा टाकली होती!माझ्या सारख्या हाडकुळ्या माणसाने सुद्धा तो प्रयोग केला होता!त्या गडबडीत नवीनचं घेतलेली पाण्याची बॉटल सॅकमधून दंन्नदिशी जमिनीवर आदळलीं होती!त्याक्षणी तिचं झाकण फुटलं अन भडाभडा पाणी सांडलं होतं!फुटलेली बाटली उचलून काय करणार होतो? तिकडे दरवाज्यातून चढणाऱ्या प्रवाशांची झुंबडं पाहात होतो!रिटारेटी सुरूचं होती!काही क्षणांनी मधमाशांचं उठलेलं मोहोळ शांत व्हावं तसं बॅगा, हातरूमाल टाकून बळजबरीनें मिळविलेल्या असनांवर काही प्रवाशी जाऊन बसले होते!ज्यांना बसायला जागा मिळालीं नव्हती तें बिचारे बसमध्ये उभेचं होते!

मी सर्वात शेवटी बसमध्ये चढून, हळूहळू उभे असलेल्या प्रवाशांना ओलांडून बॅगेजवळ पोहचलो होतो!सीट शोधत होतो!चमत्कार घडला होता!माझा लुच्चा,लफगां डाव यशस्वी झाला होता!बॅग जागेवरचं होती!एखाद्या आडदांड प्रवाशाने बॅग उचलून दुसऱ्या ठिकाणी फेकली नव्हती!मी स्वतःस भाग्यशाली समजत होतो!माझ्या बॅगेने माझं सीट रिझर्व केलं होतं!सीट शेजारी दुसरे वयस्कर प्रवाशी बसलें होतें!खिडकी शेजारी जागा मिळाली होती!मी माझ्या आधी आलेल्या,जागा अन जागा मिळता उभ्या असलेल्या प्रवाशांकडे पाहात होतो!मला लाज वाटत होती!माझ्याच नजरेतून मला तुच्छ समजत होतो!स्वार्थी कलीचा परिणाम होता का तो?
का धूर्त चपळ कोल्हा होतो? मी उभ्या असलेल्या प्रवाशांकडे पाहात होतो!माझी नजर हळूच खाली गेली होती!कंडक्टर दादांनी डबल बेल दिल्याचा कानी आवाज आला!लालपरी हळूहळू स्टॅंडमधून बाहेर निघत होती!मी खिडकीतून बाहेर पाहात होतो!हळूहळू नंदुरबार मागे जात होतं!मी कॅपचर्ड सीटवर बसलो होतो!सीट काटेरी वाटत होतं!अंतरात्म्यातून हरलो होतो!चालत्या लालपरीतून बाहेर पाहात होतो!दूरवर नजर भिरभिरत होती!मनात म्हणत होतो,’जगासोबत मीही बदललो आहें!स्वार्थी होऊन अन्याय करतो आहें!’ नंदुरबार मागे गेलं होतं!शेत, जंगल तसेंच होते!नैसर्गिक स्वभाव घेऊन स्वच्छ पवित्र होते!हिरवाईतून प्रसन्नतेच हसरं दिसत होतं!आम्ही माणूस लोभी बदलला आहें!बस पळत होती!माझं मनही पळत होतं!
(नंदुरबार-पुणे प्रवासाचा थरारक अनुभव पुढील भाग-०२ मध्ये पाहू!धन्यवाद!)
लालपरी नंदुरबार-पुणे (भाग-०२)
लालपरी नंदुरबार-पुणे
(अनुभव आगळा वेगळा)
(भाग-०२)
नानाभाऊ माळी
मी नंदुरबार-पुणे एसटी लालपरीनें पुण्याला यायला निघालो होतो!तो २० जूनचा दिवस होता!बसमध्ये बसायला जागा मिळवली होती!माझ्या शेजारी वयाची पंचाहत्तरी गाठलेले जेष्ठ व्यक्ती बसली होती!कंडक्टर तिकिटं काढत,गर्दीतून एक एक पावलं पुढे सरकत आले होते!मी पुण्याचं तिकिटं मागितलं, तसं तें बोलले होते,’नाशिकपर्यंत घ्या पुढे तेथून पुण्याचं नविन तिकिटं काढून घ्या!ही गाडी कदाचित नाशिकपर्यंतचं असण्याची शक्यता आहें!’ माझ्या मनात उगाचं शंकेची पाल चुकचूकली होती!कंडक्टरकडे दुर्लक्ष करीत आग्रहाने पुण्याचंच तिकिटं काढलं!पूण्याचं तिकिटं माझ्या हाती देऊन कंडक्टर पुढे निघून गेलें होते!बस वेगाने पळत होती!गर्दी तुफान होती!
माझ्या शेजारी बसलेल्या दादानां बोलतं केलं होतं!पीक पाणीचा विषय निघाला होता!तें बोलतं होते!मी ऐकत होतो,’मध्येचं पाऊस येऊन गेला!काहींनी पेहरलंय!काहींची पेहरणी बाकी आहें!आता पावसाने दडी मारलीआहें!शेतकरी आशाळभूत नजरेने आकाशाकडे पाहतो आहें!काळी आई पाण्यासाठी आसूसली आहें!नवीन पोरांचं शेताकडे लक्ष नाही!मशागत द्यानत नाही!तोंडात घुटक्याचा डुच्चा टाकून दिवसभर गावभर हिंडत,मोबाईलमध्ये बोटं टोचत बसतात!स्वस्तात रेशनच धान्य मिळतं!कष्ट करायच नाही!मेहनत नाही!आळशी झालेली आजारीं मरतुकडी ही रोगट पोरं आहेत!बैलं गेला,बैलंगाडी गेली,शेतीची अवजारं गेली!
ट्रॅक्टरनें शेती उस्कटून नांगरणी होत आहें!आता तर यंत्राने पेहरणीही होते आहे!शेतात जायची गरज नाही!पोरं फिरतात व्यसनी टुक्कार होऊन!’ एका दमात हृदयातली व्यथा मांडून व्यथित अंतकरणाने बोलत होते!तितक्यात ‘टिंग’ अशी सिंगल बेल कानी पडली होती निजामपूर-जैताने गाव आलं होतं!त्या दादांचं गाव आलं होतं!मला हात करीत खाली उतरले होते!त्यांच्या अनुभवांचे व्यथित बोल अनंत प्रश्न मागे सोडून बसमधून खाली उतरले!त्यांचं ऐकून माझंही मन व्यथित,दुःखी झालं होतं!बस साक्रीकडे पळत होती!मी खिडकीतून भामेर किल्ला अन सौर ऊर्जेच्या पॅनलचं प्रचंड जाळं,समुद्रासारखं दिसत होतं!मी त्या दादांच्या शब्दांनी व्यथित झालो होतो!डोळे खिडकी बाहेर भिरभिरतं होते!खिडकी बाहेरील दृश्य टिपण्यात व्यस्त होते!भामेर किल्ला बसमधून पाहायचा प्रयत्न करीत होतो!

लालपरीमध्ये साक्रीहून पुन्हा गर्दी वाढली होती!दोन दोन सिटच्या बाकड्यावर तीन तीन जन बसले होते!इतर प्रवाशी आतल्या रांगेत उभे होते!लालपरी पोट फुगवून निघाली होती!साक्री तें पिंपळनेरपर्यंत रस्त्याचं काम सुरू असल्याने खाच खळगे, खड्डे झालेलें होते!लालपरी माणसं कोंबून वेडीवाकडी होतं पळत होती!रस्त्यावरील स्पीड ब्रेकर आडवे होऊन बसच्या वेगाला लगाम लावत होते!तरीही माणसांनी कोंबलेल्या बस नावाच्या फुगलेल्या हत्तीस घोडं समजून ड्रायव्हर पळवायचा प्रयत्न करीत होता!बस लांबच्या प्रवासाला निघाली होती!पुण्याला जात होती!डुलणाऱ्या हत्तीस घोडं ओढत होतं का??वेळेचं नियोजन सांभाळून ड्राइवर-कंडक्टर बस चालवीत असतात!
साक्री-पिंपळनेर दरम्यान अनेक स्पीड ब्रेकर होते!बसमध्ये सर्वात शेवटी सीटवर बसलेलें प्रवाशी स्पीडब्रेकरमुळे हमखास उधळून बसच्या टपाला डोकं धडकण्याची भीती होती!झालही तसंच!बस पळत होती!अचानक स्पीब्रेकरवरून बस पूढे जात असतांना मागे बसलेली, मोबाईलमध्ये एकचित्त झालेली एक तरुणी सीटवरून उधळलीं!धाडकन बसच्या टपाला तिचं डोकं ठोकलं गेलं होतं!डोक्याला मुका मार बसला होता!तशी ती चिडून,रागाने ड्रायवरला अस्सल गावरानं मराठी भाषेत शिवी हासडू लागली होती!रडतही होती, मोठमोठ्याने शिव्या देत होती!डोक्याला मुक्का मार बसला असावा!तीच्या मुखातून येणारी शिवी कानाला ऐकावीशी वाटत नव्हती!कंडक्टर मागे येऊन तिची समजूत काढीत होता!तरुणीचीं शिवराळ भाषा कुठल्याही प्रवाशाला आवडली नव्हती!ती तरुणी जख्मी वाघीनीसारखी उसळून कंडक्टरवर डरकाळी फोडत होती!बिचारा कंडक्टरही गप्प बसला होता!
बसचा वेग,स्पीड कमी होऊन बैलगाडी चालावी तशी पळू लागली होती!मध्येचं ड्रर्र…ड्रर्र आवाज कानी पडत होता!गियर व्यवस्थित पडत नव्हते की काय,माहीत नाही!बस झटके देत देत पिंपळनेरला पोहचलीं होती!बस स्टॅंडमध्ये जात असतांनाचं त्या तरुणीचा कोणीतरी नातेवाईक मोटरसायकलवर आला होता!ती तरुणी खाली उतरली होती!तिचा नातेवाईक,पंचवीशीतला तरुण असावा!त्याची कंडक्टरसोबत हमारीतुमरी सुरू झाली होती!बस ड्राइव्हर गाडीची समस्या सांगत होते!पण आवाज वाढविल्याशिवाय भांडण्यात मजा नसते असं म्हणतात!तो तरुण गावातलाच होता!आवाज चढवून कंडक्टरशी मुखयुद्ध सुरू होतं!
शिवीगाळ सुरूचं होती!हमरी तुमरी सुरूचं होती!बसमधल्या अनेक प्रवाशांनी त्या तरुणांस सांगायचा प्रयत्न केला होता!पण कसं असतं,’मेरे गावमें मैंचं शेर हूँ!’ या तत्वानुसार वाघडरकाळी सुरू होती!बिचारे कंडक्टर-ड्रायव्हर काय बोलणारं?खूप समंजस होते!शिवीगाळीची काहीतरी हद्द असावी!सीमा रेषा असावी!त्या तरुणीचा नातेवाईक का कोण तो तरुण शिवीगाळ अन शक्ती प्रदर्शन करण्यात हुशार असावा!कंडक्टरसोबत अशोभनीय वर्तन सुरू होतं!तें कुणालाही आवडलं नव्हतं!रुचलं नव्हतं!
भांडण गोंधळात ड्रायव्हर बस सुरू करीत होते!इंजिनचा खर्रर्रर्र खर्रर्रर्र आवाज येत होता!पाच दहा मिनिटात कंटाळून ड्रायव्हर बोललें,’डिझेल सप्लाय पाईप लिकेज असल्याने गाडी जाणार नाही!गाडी कॅन्सल झाली आहें!सर्व प्रवाशांनी उतरून घ्या!इतर जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना पाठवलं जाईल!’ नंदुरबार-पुणे बस रद्द झाली होती!सर्व प्रवाशी अतिशय नाराजीच्या सुरात आपापले सामान उचलून बसखाली उतरले होते!सर्व प्रवाशांना वेगवेगळ्या बसमध्ये बसवून कंडक्टर मला बोलले,’या बसमध्ये पुण्याला जाणारे तुम्ही एकटे होते!आता तुम्ही नाशिक पर्यंत येईल त्या बसमध्ये बसा!नाशिक पासून मी मेमो देतो डेपो कंट्रोलर साहेबांना दाखवा!तुमचं तिकीट जपून ठेवा!’ अक्कलकुवा-नाशिक बसमध्ये मला बसवलं!
शेवटचं सीट मोठया मुश्किलीने मिळालं होतं!आधीच्या लालपरीतं पुढचं सीट होतं!या बसमध्ये शेवटचं सीट मिळालं होतं!आधीच्या बसमध्ये कोणाचं तरी सीट हिसकावून घेतलं होतं!आता मला ठोकरलं होतं!पेहरलं तसं उगवत असतं!उभं राहण्यापेक्षा सीट मिळाल्याच समाधान खूप मोठं होतं!यात दोष कुणाचा होता?प्रसिद्ध भावगीत गायक स्वर्गीय सुधीर फडके यांच्या मुखी गीतरामायण ऐकतांना असंच जाणवत राहात’….दोष ना कुणाचा!’
नवीन बसमध्ये बसलो होतो!मागचं गेलं तें जाउद्या….नवीन अक्कलकुवा-नासिक लालपरी बसचा नवप्रवाशी झालो होतो!बदल अन परिवर्तन स्वीकारण्याची मानसिकता माणसातं आली पाहिजे!अघटित घटना,घडामोडी लहरी हवामानासारख्या असतात!अचानक काहीही घडू शकतं!मी नाराज होऊन काय करणार होतो!सकारात्मकतेचा पाढा जपून पूढील वाटचालीस प्रारंभ केला होता!प्रवास असाच असतो!जगणंही असंच असतं नाही का!!
संध्या छायेतं नाशिकला पोहचलो होतो!रात्रपडदा गडद होऊ लागला होता!हळूहळू घड्याळकाटा रात्रीचे आठ वाजल्याचा संकेत देत होता!दुपारी नंदुरबारहून निघालो होतो!पुण्याला जाणारा मी रात्री आठ पर्यत नाशिकलाचं होतो!
(नंदुरबार-पुणे प्रवासाचा चित्तवेधक अनुभव पुढील भाग-३ मध्ये पाहू!नमस्कार!)
लालपरी नंदुरबार-पुणे (निरोपाचा भाग-०३)
लालपरी नंदुरबार-पुणे
(चित्तवेधक अनुभव)
(निरोपाचा भाग-०३)
नानाभाऊ माळी
माणूस ‘अनुभव खजिना’ घेऊन वाटचाल करीत असतो!घडून गेलेलं, हृदयात साठवायचं!तें अनुभव निरूपण असतं का मग?कथन वास्तव असेल तर निरूपण सजीव होत जात असतं!मीही जीवंत अनुभव सजीव करायचा प्रयत्न करीत असतो!जीवंत अनुभव वास्तवाला स्पर्श करीत असतो!वास्तव जगलेलं नेहमीचं सात्विक अन पवित्र असतं!अशा अनुभवातुन सारेच जात असतात!प्रवासातील सत्य कथनाने अनुभव शिदोरी विस्तृत होत जाते!मन, बुद्धी, वेळेची भूक भागवीत असते!….. झालं असं की मी २०जून २०२५ ला दुपारी १२-३० ला नंदुरबार-पुणे एसटीत बसलो होतो!प्रवास अनेक घडामोडींचा आरसा असतो!आपल्या समोर आरसा मांडतो आहें!
नंदुरबारहून लालपरी निघाली होती!ती बस पिंपळनेरला नादुरुस्त झाल्याने कंडक्टर-ड्रायव्हर दोघेही सोबत नव्हते!दुसऱ्या एसटीत बसवलं गेलं होतं!नाशिकला पोहचलो होतो!त्या दरम्यान अनेक घडामोडी घडत गेल्या होत्या!पुण्यापर्यंत तिकीट होतं पण जायला एसटी कुठली हा प्रश्न होता?कंट्रोलर साहेबांनी तिकिटावर शिक्का मारून देत नाशिक-पुणे एसटी कंडक्टर यांना सांगून एसटीत सन्मानाने एसटीतं बसवलं होतं!हा चांगुलपणा कधीही विसरण्याजोगा नाही!रात्री आठ वाजता नाशिकहून लालपरी निघाली होती!पुढील पाच तासांतं मध्यरात्री एक वाजता पुण्याला कासारवाडी येथे पोहचलो होतो!झिमझिम पाऊस सुरूचं होता!
कासारवाडीहुन नवीन शिवाजीनगर (वाकडेवाडी)बसस्टॅंडलां जायला ड्रायव्हर-कंडक्टर यांनी स्पष्ट नकार दिला होता!बस सरळ भोसरीकडे वळवली होती!कारणही तसंच होतं!माझ्या मोबाईलचीं बॅटरी संपल्यामुळे मोबाईल बंद पडला होता!माझी संपर्क यंत्रणा पूर्णतः कोलंडली होती!….पंढरपूर वारीला निघालेल्या संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली अन जगद्गुरु संत श्रीतुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम पूण्यात होता!लाखो वारकरी,दिंड्या पुण्यात मुक्कामी होतें!सर्वत्र माणसांची वर्दळ होती!भक्तीची आसं घेऊन वर्दळ होती!निस्सीम श्रद्धा भेटीची होती!निरामय श्रीविठू माऊलीच्या हृदयी बसण्याची आसं होती! ओढ होती!नाशिक फाटा, कासारवाडीहून अपरात्री पुण्यात, हडपसरला कसं जावं ही जटील समस्या होती!अनेकजन स्वारगेटपर्यंत शेयर रिक्षानें निघाले होते!मीही त्यांच्यासोबत स्वारगेट स्टँडला उतरलो होतो!
उत्तर रात्रीचे ०२ वाजले होते!पावसाची रिपरिप सुरूचं होती!रिमझिम पावसाला अंगावर घेत स्वारगेट स्टॅंडवर पोहचलो होतो!तिथलं दृश्य काही वेगळंच होतं!पंढरपूरला पायी जाणारें वारकरीं बस स्टॅंडवर जागा मिळेल तिथे अंथरून टाकून झोपले होते!पावसामुळे सगळं वातावरण चिखल माती चिकचीक झालं होतं!चालून थकून वारकरी हरीला अर्पण करुन शांत झोपले होते!बसस्टॅंड श्रीविठ्ठलमय झालं होतं जणू!मी हडपसरला राहात असल्याने अपरात्री जाणं शक्यच नव्हतं!स्वारगेट स्टँडमध्ये बसण्यासाठी छोटीशी जागा मिळवली!!रात्रभर डासांची भूनभून सुरूचं होती!नशिबाने माझ्याजवळ ब्लॅंकेट होतं!पांघरून बसलो होतो!
प्रवासाला निघतांना नेहमीचं ब्लॅंकेट बॅगेत सोबत असते!स्टॅंडबाहेर संततधार पाऊस सुरूचं होता!ब्लॅंकेट अंगाभोवती गुंडाळून बसलो होतो!बसून बसून डुलकी घेत होतो!गुडघ्यात डोकं ठेवून सभोवती ब्लॅंकेट पांघरून ऊबदार वातावरणात बसलो होतो!डासांपासून सुरक्षा मिळत होती!बसून कंटाळा आला होता!सिटीबस साडेपाच वाजल्याशिवाय सुरू होणार नव्हती!डोकं गुडघ्यात ठेवल्याने पाठ, मान दुखू लागलें होते!मी डुलक्या देत बसलेल्या एका वारकरी दादाला किती वाजले म्हणून विचारलें असता पहाटेचें चार वाजल्याचे कळले होते!माझा मोबाईल बॅटरी डाऊनमुळे बंद पडला होता!
बसस्टॅंड सार्वजनिक ठिकाण असल्याने तेथे जाऊन बसू शकलो होतो!अन्यथा अपरात्री इतर ठिकाणी लूटमार किंवा हाकलून लावलं असतं!पहाटेचें चार वाजले होते!पावसाची संततधार कमी झाली होती!ब्लॅंकेट गुंढाळून घडी केली!सॅकमध्ये ठेवून आतली छत्री बाहेर काढली!बसून बसून पाय आखडल्या सारखे झाले होते!पहाट झाली होती!सिटी बस सुरू झाली नव्हती!बसलेल्या प्रवासी, वारकरीमध्ये बोलणं सुरू झालं होतं!कुजबुजू सुरू झाली होती!उजेड पडल्यावर पक्षी घरटे सोडून उडू जातात!स्टॅंडवरील माणसं देखील उठत होते!एक एक प्रवाशी उठून स्वच्छता गृहाकडे जात होता!पाठीमागे सॅक अडकवली अन मी ही लालपरीचं घर सोडून सरळ हडपसरदिशेने पायी चालत निघालो!
स्वारगेट तें भैरोबा नाल्यापर्यंतचं अंतर सहा किलोमीटर असावं!मी छत्री उघडून चालत होतो!भैरोबा नाल्याजवळ अचानक एक कुत्र भुंकत अंगावर आलं होतं!त्याला हातवारे करुन हुसकून लावायचा प्रयत्न केल्यावर घुरघुरून जोरात दात उस्कटून भुंकत अंगावर आलं होतं!माझ्या पायाची नडगी त्याच्या तोंडी जाते की काय अशी भीती वाटू लागली होती!त्यानंतर पुन्हा अजून अंधारातून दुसरं कुत्रही धावून आलं होतं!माझी पाचावर धारण बसली होती!झिमझिम पावसातही दरदरून घाम फुटला होता!मी हातवारे हलवणे बंद करुनतोंडानें,’पुच पुच, पुचु पुच!’करू लागलो होतो!कुत्र्यांची नागासारखी फना काढलेली शेपूट हळूहळू जमिनीकडे झूकू लागली होती!अंगावर येणाऱ्या कुत्र्यांनां शरण गेलो होतो!कुत्र्यांनी भुंकन थांबवत माझ्या जवळ आले!शेपूट हलवू लागले!
मी भीत भीत माझा हात पुढे केला अन तें माझा हात चाटू लागले!मला हायस वाटलं होतं!जर तें चावलं असतं तर!एक नाही दोन कुत्रे होते!थोडा वेळ माझ्या पूढे मागे चालू लागले!नंतर आपल्या जागेकडे माघारी फिरले होते!मी आतून जबरदस्त घाबरलो होतो!हळूहळू सोलापूर रोडने चालत रामटेकडी पर्यंत पोहचलो होतो!साधारण आठ किलोमीटर चाललो असेल सकाळचे साडेपाच वाजले होते!वाहने धावत होती!एक-दोन सिटी बसही धावतांना दिसल्या!रामटेकडी बसस्टॉपवरून हडपसर बसने बसलो!अवघ्या दहा मिनिटात हडपसररला पोहचलो!पूढे घरी जायलाही दुसरी बस भेटली होती!घरी सकाळी साडेसहा वाजता पोहचलो होतो!
आधीच्या दिवशी दुपारी १२-३० वाजता नंदुरबारहुन लालपरीनें प्रवासाला सुरुवात केली होती!दुसऱ्या दिवशी १८तासांनी घरी पोहचलो होतो!प्रवासाने धडा दिला होता!शिकवलं होतं!अनेक संकट येतं गेली!कधी एसटीने शिकवलं!माणसांनी शिकवलं!वारीतील वारकऱ्यात विसावलेला पांडुरंगही भेटला!अंगावर येणाऱ्या कुत्र्यांपासूनही कुठल्यातरी अगाध शक्तीने वाचविले होते!जीवंत अनुभव वाटसरू म्हणून सतशील जगण्याचा संदेश देत असतात!मी अनुभव जगून प्रवाशी झालो आहें!अनुभवानंद घेत आहें!
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१३ जुलै २०२५