मैत्रीचा डाव
(“मैत्रीचा डाव“)
~~~~~~~
मैत्री एक डाव असे
सर्वत्र थोडासा बरा
आल्या संकटात जसे
स्वयं असे झुंजणारा //१//
झुंजतो जो वारा एक
विश्वासाने वाहणारा
असे तो सुद्धा प्रत्येक
आपुलकीचा हा झरा //२//
मैत्री हा असाच खेळ
असतोच खरा तोही
घातला जो ताळमेळ
मऊ तो विटेपेक्षाही //३//
दोहोंनीच खेळायचा
असतो हा खेळ सारा
एकमेकांना द्यायचा
असतो दोहोंनी थारा //४//
दोन्हींही कडून याव्या
निस्सीम प्रेमाच्या धारा
दोन्हींही बाजू असाव्या
एकमेकांच्या आधारा //५//
दोन्हीं असे खेळायला
एक थोडासाही जरा
लागे बादच व्हायला
दुसरा येई आधारा //६//
दोन्ही डाव खेळायला
देती सर्व काळी नारा
डाव तो सांभाळायला
हजर होई दुसरा //७//
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मैत्री-दिनाच्या निमित्ताने
मैत्री-दिनाच्या निमित्ताने…(सहा स्फुटं)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गणिताच्या ‘भाषे’चा मी सख्खा मित्र
मला सहज शक्य होते,
आठला गुणून चारने चौसष्ट पर्यंत पोचणे
परंतू विसाव्या शतकाच्या
त्या आठव्या-नवव्या दशकातील चकव्याने
घेरले मला अकस्मात नैतिकतेच्या नावाखाली,
अखेर …
अव्हेरले मला माझ्या या प्राणप्रिय गणिताने,
त्या चकव्याच्या अगम्य/प्राचीनतम प्रभावात,
आणि
चुकले माझे गणित नेहमीसाठी.
¤
चौसष्ट कला आणि चौदाही विद्या
सहज साध्य होतात गणिती-वृत्तीला
पण जेव्हा मित्रवर्य गणितच अव्हेरतो
आपली जन्मापासूनची मैत्री
आणि
तीव्र स्तंभ वारंवार लवचीक होतो
नैतिकेच्या मौन-रहस्यात
तेव्हा
बृहन्नडा झालेल्या अर्जुनाची शिष्या उत्तरा
कालबाह्य झालेली असते.
¤
कालबाह्य झालेल्या काही कालातीत परंपरा
रूढीप्रिय नैतिकेला वाकुल्या दाखवूनही
गणिताला रढीग्रस्त करून सोडतात
आणि
मैत्रीच्या आवरणाखाली मौनाला दडवून
गणितावरच आरूढ होतात
तेव्हा
देहोत्सवाच्या पलीकडचे वास्तव
निसटून गेलेले असते.
¤
वसंत-ग्रीष्म-वर्षा सारे आवर्तनमुक्त ऋतू
कामप्रेरणेच्या आवारात विलंबित असताना
नैतिकतेचे सारे अनुत्तरीत गणित
महास्वप्नाच्या भलेपणात विलीन होऊन
मैत्रीभावाला पारखे होतात
आणि
इतिहासात दाखल होता होता सारे आभास
अचानक दृष्टिगत होतात.
¤
निवृत्तीला एकच पायरी शेष असताना
सत्तावनावे पथभ्रमित अवतरण
इंद्राच्या दरबारात नैतिकतेचे धडे गिरवत
साऱ्या ‘दैवी’ अप्सरांच्या साक्षीने
मैत्रीच्या गणिताला ‘कबीरा’पुढे ठेवते
आणि
भकास झालेला प्रच्छन्न विद्रोह
दोन घोड्यांवर स्वार होऊन
खाणाखुणा पुसत जातो.
¤
पुसता पुसत नाहीत त्या खाणाखुणा;
गणितासारखा सख्खा मित्रही फितूर होतो
उत्तरांना लकवा मारून जातो
स्थल-काल विरचित होत जातात
आणि
नैतिकतेचे सडू लागलेले शव सावरत
आधुनिक अर्जुन उत्तरेलाच बृहन्नडा करू लागतो,
तेव्हा
आदिम मैत्रीभाव त्याच्या स्वयंभू अभावानेच
नैतिकतेची शिकार ठरू लागतो.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(01.08.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दोस्ती
दोस्ती
अबार कारा ढग गडगडते
झिमूर झिमूर धार बरसते
पानी मुरते तई झिरपते
इहीर भरते पाट पायते
नांगर वकराबिना पेरना
वाया जाते चोकट दाना
दाना पेरा मस्यागतीना
लावा बानी पीक खजाना
मतलब सादत दुनिया सारी
डाव सादून चूल येगरी
तिडका थोडा तिडकला जरी
कोल्ती चुलीतुना बाहारी
सोंग सादुचा घेत ढोकरी
घटघट घिटकत फस्त मासरी
ढोंगा सोंगावरी बिचारी
अडकुन बसते दुनिया सारी
सच्ची दोस्ती परान हाती
वारासाटी हाजिर साती
जिगरबाज ते पक्की दोस्ती
अर्दा अर्दा वाटुन खाती
#मुरलीधर_खोटेले.
( सटका . . . संग्रहातून साभार )
