माड नारळाचे झाड मराठी कवीता
देवगडच्या श्री प्रमोद जोशी यांच्या बागेत५०.. ६० वर्षे वयाचा माड आहे. त्या माडावर सुतार पक्षांनी १.२ नाही १७.१८ भोके पाडली आहेत. तरीही अजून माड नारळ देतोच आहे. सोबत माडाचा फोटो आणि जोशींनी त्या माडावर स्वतः केलेली (माडाचे मनोगत) ही कविता पाठवत आहे. आवडेल अशीच आहे.
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!
माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!
त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!
वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!
जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!
वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!
घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!
सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!
पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!
जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!
प्रमोद जोशी, देवगड.
पुनर्प्रसारीत पोस्ट।