काकस्पर्श मराठी लघूकथा
काकस्पर्श
एक लघूकथा
वयाच्या सत्तरीत कारभारीतात्यांनी आज घडीला, गाव कुसाच्या वाडीवस्ती पासून ते गाव वस्तीतला वाडा, खळवाडी, गोठा,जमीन जुमला, होत नव्हतं तेवढं सात नवसाच्या आपल्या वंशांच्या कुल दिपकाच्या नावे करून मोकळे झाले होते !
थोडी बहू स्वःता व बायजा काकू साठी काटकसरीने पोटातल्या पोट साठवलेली तुटपूंजी नासरी, दमडी, खडकू, आणा, पैशा पासूनची जमापुंजी ते बायजा काकूच्या गळ्यातील पिढीजात सौभाग्याचे लेन अंलकारा सह भरला पदर रिता करत तालुक्याच्या वृद्धाश्रमाला दाणं देऊन कारभारी तात्या कुटूंब कबिल्या सह स्वःताच्या आयुष्याची वयाची पंचाहत्तरी वृद्धाश्रमात साजरी करून मोकळे झाले होते.
काही दिवसांनी स्वःता सह आपली धर्मपत्नी बायजा काकू समवेत वंशाच्या दिव्याच्या आग्रहा खातर नको नको म्हणत असतांना देखिल नाविलाजाने आश्रयाला परदेशात गेले खरे परंतू !
नव्याची नवलाई नऊदिवस असते तेच खरे !
नंतर मात्र तात्या काकूंचा खेडवळ वागण्याचा, बोलण्याचा, राहणी मानाचा तिरस्कार होऊ लागला. खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली,बंगल्यात भांडणं वादविवाद तात्या काकूंच्या वास्तव्याने नित्याचीच होऊन गेली होती!
सुनेची धुसफूस आदळ आपट बघून वंशाच्या दिव्याने त्याच्या अलिशान बंगल्यात वृद्ध माय बापाला न ठेवता, फॉरेनच्या बंगल्यात *आपली खेड्यातली मायबाप आता अडगळ वाटू लागली ! मायबापाची गेस्ट हाऊसमध्ये राहायची सोय करून मोकळा झाला तो कायमचाच !
एके काळचा गावगाडयाचा, मोठ्या वाडयाचा, घरंदाज कारभारीतात्या आज मात्र वार्धक्यात स्वःताच्याच मुलाच्या बंगल्यात कफल्लक होऊन भल्या मोठया वाड्याचा मालक अडगळीत भणंग भिकाऱ्या सारखा गेस्ट हाऊसच्या कोपऱ्यात बायजा काकूच्या संगतीत धोतराच्या सोग्यात तोंड खूपसून गावगाडयाचे पुर्वीचे वैभव आठवत,पश्चातापाने ढसा ढसा रडत होता.
तात्यांच्या त्या विदारक दुःखद आठवणीत बायजा काकूचा रिता पदर रात्र रात्र जागून भिजायचा ! परंतू त्यांचे अश्रृ पुसायला साता समुद्रापार, तेही जवळ असून, ना वंशाचा दिवा, ना फॉरेनची सुनबाई ,ना नातू, ना पनतू !
गावच्या गणगोत सगेसोयरे गोतावळ्यातले भावकीतले नावाजलेले कारभारीतात्या बायजाकाकू आज मात्र नाथअसून अनाथा सारखे मरणासन्न अवस्थेत कधी खाई तूप रोटी । कधी राही अर्धपोटी । कधी झोपे गादीवरी । कधी घोंगडी अंथरी । अशा स्थितीत मरण
येत नाही म्हणून दिवस ढकलत होते.
कारभारीतात्या आता नव्वदीच्या पार होते कधीकाळी भरदार देहयष्टीचे तात्या आज अंथरूणावर लुळे पांगळे होऊन पडून होते काकूच्या हातात काठी आली होती परंतू हातापायांनी साथ सोडली ती दुर्धर संधीवाताने ! कान, डोळे एकाच वेळी गेल्याने पडून राहण्या शिवाय पर्याय नव्हता.
शेवटी जे व्हायला नको तेच झालं, मुलाने तात्या कांकूना पुन्हा एकदा मायदेशी *तालुक्याच्या वृद्धाश्रमात आणून घातलं ते कायमचेचं ! कारभारीतात्या बायजा काकूचा आयुष्याचा शेवटचा प्रवास,शेवटचा मुक्काम वृद्धाश्रमात व्हावा या इतकी तात्यांच्या जिवनातील वाईट गोष्ट नव्हती !
ज्या अनाथ वृध्दाश्रमात दाणधर्म करून वयाची पंच्याहत्तरी साजरी केली होती तीथूनच एके दिवशी तात्या काकूंची कर्म सोहळ्याची यात्रा वृद्धाश्रमातील अनाथांच्या खांद्यावरून निघाली खरी परंतू घरचा ना खांदा ! ना शिधा!
ज्या वंशाच्या दिव्यापाई स्वःताच्या आयुष्याची, संसाराची वाताहात करून घेतली तो कुलदिपक गंगेकाठी आला तो माय बापाच्या वर्षाच्या पिंड दानालाच !
पिंडाच्या पानाला साष्टांग दंडवत घालून देखिल संध्याकाळ पर्यंत कावळा मात्र शिवलाच नाही !
लेखक गावगाडाकार श्री साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक
