मराठी कथा दोन बेडुक
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण मराठी कथा दोन बेडुक
दोन बेडुक होते. खेळता खेळता दोघेही एका कोरड्या विहीरीत पडले. ती विहीर बर्या पैकी खोल होती. दोघेही वर येण्याचे खुप प्रयत्न करु लागले. बघता बघता इतर सार्या बेडकांचा गोतावळा विहीरीच्या काठावर गोळा झाला. विहीरीतले बेडुक थोडं वर चढायचे, आणि लगेच खाली पडायचे, त्यांना जागोजागी खरचटायला लागलं.
वरुन त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली. कशाला धडपड करताय? ह्या विहीरीतुन तुम्ही कधीही वर येऊ शकणार नाही. आता आहात तसेच रहा. एवढं अंतर चढुन वर येणं, तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. तेव्हा रक्तबंबाळ होण्यात काहीच अर्थ नाही, बाहेर येण्यास धडपडु नका. दोघा पैकी एका बेडकाने तो सल्ला ऐकला, आणि तळाशी जाऊन तो स्वस्थ बसला. त्यालाही वाटलं की आता इथुन बाहेर पडणं अशक्य आहे.
दुसऱ्या बेडकाने मात्र प्रयत्न करणं चालुच ठेवलं. तो उड्या मारत राहीला. वरुन जसजसा गोंगाट वाढला, तसतसे त्याचे प्रयत्नही वाढत राहीले. त्याचा हुरुप वाढत राहीला. आणि बघता बघता तो काठावर पोहचला सुद्धा. आता सर्व बेड्कांना त्याच्या धैर्याचं खुप खुप आश्चर्य वाटलं.
त्यांनी विचारलं, “आम्ही नको नको म्हणत असताना तु वर कसा काय चढु शकलास?” तेव्हा त्यांना कळालं की तो चक्क बहीरा होता. त्याला काहीच ऐकु येत नव्हतं. उलट त्याला वाटत होतं की, हे सर्व त्याला ओरडून ओरडून प्रोत्साहन देत आहेत. आणि म्हणुनच तो वर चढण्याचं धाडस करु शकला होता.
आपल्याही आयुष्यात कधी कधी असं बहीरं होणं आवश्यक असतं. इतिहासात डोकावुन पाहीलं तर हेच दिसेल की, अकल्पनीयरित्या विलक्षण यशस्वी झालेले लोक बहीरे होते किंवा आजुबाजुला नकारात्मक गोंगाट करणार्या गोष्टी समोर त्यांनी ठार बहीरे असल्याचं सोंग घेतलं होतं.

अमेरीकेत नॉर्थ केरोलिना शहरात राहणार्या, एका गरीब कुटुंबात दोन भाऊ राहत होते. लहानपणा पासुनच त्यांना कुतुहल होते, जर हवेत पतंग उडु शकतो, पक्षी हवेत उडु शकतात, तर हवेत तरंगणारं एखादं यंत्र तयार करुन, त्यात बसुन, माणुस हवेत का उडु शकणार नाही? ह्या कल्पनेने ते भारावले होते. ओरोविल आणि विल्बर राईट ही त्यांची नावे. त्यांचं एक गॅरेज होतं, वर्षातुन सहा महीने त्यात ते सायकली रिपेअर करायचे. पंचर काढायची, पैसे जमवायचे आणि उरलेले सहा महीने हवेत उडणार्या ग्लायडरचे प्रयोग करण्यात वेळ आणि पैसे खर्च करायचे. सगळं जग त्यांच्यावर हसायचं. दोघांपैकी एकाकडेही साधा डिप्लोमा देखील नव्हता.
हे दोघे सायंटिस्ट असल्याच्या अविर्भावात वावरतात म्हणुन लोक त्यांच्या प्रयोगांवर, त्यांच्या उड्डाणांवर फिदीफीदी हसत. त्यांची टिंगल करीत, लोकांच्या उपहासासमोर आणि टीकेसमोर राईट बंधु बहीरे झाले, आणि त्यांनी काम सुरुच ठेवलं. थोडीथोडकी नव्हे, तब्बल सोळा वर्ष अविरत प्रयोग केले, अनेक आकृत्या काढल्या, अनेक सुत्रं मांडली आणि एके दिवशी नियती त्यांच्या समोर झुकली आणि विमान हवेत उडाले. राईट बंधु इतिहासात अमर झाले.
राजीव भाटीया उर्फ अक्षय कुमार हा आजच्या काळातला सुपरहीट हिरो. नव्वदीच्या दशकामध्ये त्याचा बॅड पॅच चालु होता. त्या दोन-तीन वर्षातले त्याचे बहुतांश चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत होते. तेव्हा एका पत्रकाराने त्याला कुत्सितपणे विचारलं, तुझे ओळीने तेरा चित्रपट फ्लॉप झालेत, याबद्दल काय सांगशील? अक्षय हसुन म्हणाला, तु सांगतोयस ते खरे नाही. माझे तेरा नाही तर सोळा पिक्चर ओळीने फ्लॉप झाले आहेत. पण त्यामधुन मी शिकेन आणि अजुन जोमाने काम करेन. जगाने केलेल्या टिके समोर अक्षयकुमार बहीरा झाला आणि म्हणुन पंचवीस वर्षा पुर्वी पाच हजार रुपयांवर काम करणारा माणुस आज फक्त नऊशे त्र्याहत्तर करोड रुपयांचा मालक आहे.
ब्रायन एक्टन नावाचा माणुस जेव्हा फेसबुक कंपनीत मुलाखत द्यायला गेला तेव्हा नौकरी करण्यास तो योग्य नाही असं सांगुन त्याला नाकारलं गेलं. इतकचं काय ट्विटर कंपनी मध्येही त्याला काम मिळालं नाही. जगाच्या नकारा समोर, निराश न होता, त्यानंही बहीर्याचं सोंग घेतलं, आणि आपल्या काही मित्रांना घेऊन वॉटसएप कंपनी सुरु केली. तीच वॉट्सएप कंपनी, फेसबुकने एकवीस बिलीयन डॉलर्स म्हणजे तब्बल एक लाख एकोणचाळीस हजार करोड रुपयांना विकत घेतली. अपयशा समोर बहीरा झाल्याचा ब्रायन एक्टनला असा फायदा झाला.

स्टीव्ह जॉब्जला, त्याच्या उद्धट वर्तनाबद्दल, त्यानेच बनवलेल्या एप्पल कंपनीतुन अपमानित करुन, काढुन टाकलं गेलं. सिलीकॉन व्हॅलीत, जिकडे तिकडे त्याच्या अपयशाच्या चर्चा होत्या. इतकं की त्याचं बाहेर पडणं, लोकांत मिसळणंही अवघड झालं होतं. स्टीव्ह जॉब्ज बहीरा झाला. त्यानं नेक्स्ट आणि पिक्सार अशा दोन कंपन्या काढल्या. स्वतःच्या चुका सुधारल्या, नेक्स्टला एप्पलने खरेदी केलं आणि जगाला आयफोन, आयपॅड मिळाले. स्टीव्ह जॉब्ज इतिहासात अजरामर झाला.
थॉमस अल्वा एडीसन लहान असताना त्याच्या शिक्षकांनी त्याला मंदबुद्धी ठरवुन, त्याचं नाव शाळेतुन काढुन टाकलं होतं. त्याच्या आईने, शिक्षकांच्या सांगण्या पुढे, बहीरं व्हायचं ठरवलं. तिने एडीसनला प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. ह्याच एडीसनने पुढे चमत्कार घडवले. त्याने शेकडो शोध लावले. विजेचा बल्ब हा त्याचा सर्वात क्रांतिकारी शोध. त्यासाठी त्याने दहा हजार प्रयोग केले. सगळं जग त्याला हे होवु शकणार नाही असं सांगत असताना, तो ठार बहीरा झाला. त्याने दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत ठेवली आणि एके दिवशी बल्ब प्रकाशला. एडीसन जिंकला, पुन्हा एकदा जग हरलं.
साडेतीनशे वर्षापुर्वी जेव्हा सगळीकडे मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही राज्य करत होती, तेव्हा स्वराज्य स्थापन करणं शक्य आहे असं कोणाला स्वप्नातही वाटत नव्ह्तं. सगळे शुरवीर सरदारही गुलामगिरी करण्या खेरीज पर्याय नाही असंच मानत होते, पण शिवाजी महाराजांनी ह्या परिस्थीतीला आव्हान दिलं, आणि इतिहास घडवला.
आपल्याला रोखणारे जसे बाहेर काही आवाज असतात तसेच आपल्या आत मध्येही काही शत्रु राहत असतात. हा आतला गोंगाटच जास्त धोकादायक असतो. माणसाच्या मनात त्याला सतविणार्या चिंता पैकी सत्यान्नव टक्के चिंता ह्या फक्त कल्पनेतच रुंजी घालतात, त्या कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. मनाने उत्पन्न केलेली भीति, आणि त्या भितीचा बागुलबुवा हाच आपला सर्वात मोठा शत्रु आहे. त्याला जिंकण्यासाठीही त्याच्या पुढे बहीरे असल्याचं सोंग घ्यावं लागतं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की यशाचे सारे मार्ग सुकर होतात. आपणच आपले खरे मित्र नि आपणच आपले शत्रु आहोत. मनात चाललेल्या गोंगाटावर जे विजय मिळवतात, तेच खरे यशस्वी होतात. म्हणुन म्हणतो, “बहीरे व्हा नि यशस्वी व्हा !
