मत कुणाला देऊ ?
मत कुणाला देऊ मी
माझे मलाच कळेना
भुगा झालाय मेंदूचा
प्रश्न सुटता सुटेना..!
नेला प्रश्न आज्याकडे
त्यांनी दाखविला हात
म्हणे काँग्रेस पार्टीची
होती गरीबांना साथ..!
आई म्हटली फक्त तू
बघ कमळाचे फुल
याद राख भाजपाने
दिला गॅस नेली चुल..!
बाप म्हटला हळूच
ठेव विचार विशाल
मत टेक विकासाला
आण निवडून मशाल..!
दादा त्वेषाने बोलला
ऐक माझे त्यांना टाळ
प्रश्न जलसिंचनाचा
मार्गी लावेल घड्याळ..!
ताई हसून म्हटली
सोड ते भ्रष्ट पुढारी
मत दे तू प्रगतीला
वाज यशाची तुतारी..!
बायको म्हटली..अहो !
आणू ना धनुष्यबाण
पुन्हा मिळेल आम्हाला
अर्ध्या तिकीटाचा वाण..!
वेडा झालो पार देवा
कुणा कुणाचे ऐकावे
तूच सांग मार्ग आता
कसे बटण दाबावे..!
मित्र शेवटी भेटला
सोडविला त्याने गुंता
प्रतिनिधी भ्रष्ट तर
दाब नोटा सोड चिंता..!
कवी-देवदत्त बोरसे
(सुगंधानुज)
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.0
Pingback: निवडणूकीचं वारं - मराठी