पाणी हेच जीवन कविता
जल जिथे जीव तिथे
अरे ओ शहरी बाबू
पाणी वापर जपून
घालू नको वाया जल
वेड्या साक्षर असून..!
हंडाभर पाण्यासाठी
खेडोपाडी भटकंती
नशिबाने दारी तुझ्या
पेय जलाची श्रीमंती..!
स्नान करतो भाऊ तू
मन भरते तोवर
तासभर तरी तुझा
सुरु असतो शॉवर..!
गांवी ये ना कधीतरी
तुला कळेल दुष्काळ
ओल्या आमच्या डोळ्यात
बघ तो कर्दनकाळ..!
राग नको मानू दादा
सत्कर्माची वाट धर
पाणी भरल्यानंतर
नळ फक्त बंद कर..!
झाडे झुडपे लावून
आम्ही जल जिरवितो
धरणांच्या माध्यमाने
घरी तुझ्या पाठवितो..!
नदी,नाले शुष्क झाले
पाणी कसे मिळणार
शोध घेत गांव माझे
रानोमाळ फिरणार..!
प्रश्न विचार मनाला
पाणी कुठे बनते का ?
जल जिथे जीव तिथे
सुत्र तुला कळते का ?
बाथटब,स्विमिंग पुल
चाळे तुझे सारे टाळ
थेंबथेंब वाचव आता
तंत्र बचतीचे पाळ..!
कवी-देवदत्त बोरसे
(सुगंधानुज)
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.