पर्यटनाचे व तीर्थाटनाचे वेड

पर्यटनाचे व तीर्थाटनाचे वेड
पर्यटनाचे व तीर्थाटनाचे वेड

पर्यटनाचे व तीर्थाटनाचे वेड

पर्यटनाचे व तीर्थाटनाचे वेड!

तीर्थाटन व पर्यटन म्हटले की अगदी लहानग्या बाळापासून तर थेट नव्वदी पार केलेल्या जख्ख म्हाताऱ्या कोता-यांपर्यंत सा-यांनाच याचे चिक्कार वेड असते मग ते स्थळ निसर्गरम्य असो, धार्मिक असो की ऐतिहासिक असो! मला तर त्या वारकरी मंडळीचा खूप खूप हेवा वाटतो. दरवर्षी अगदी न चुकता ही मंडळी शेकडो मैल (आता किलोमीटर) पायी चालत चालत माऊलीचं दर्शन घेण्या आधी नाना त-हेचे उपक्रम राबवीत, विविधप्रकारचे रिंगण खेळत प्रवासातला थकवा घालवत घालवत हसत खेळत उन्हातान्हातच नव्हे तर भर पावसातही आषाढी एकादशीला पंढरपूरचा रस्ता धरतात!

अर्थातच यात नेहमीच्या शिरस्त्यानुसार होश्या, गवश्या व नवश्यांचा सर्वाधिक भरणा असतो हे ही तितकेच खरे आहे. विदर्भातील लोक मध्यप्रदेशातील बंबलेश्वरी, चव-यागडावरील महादेवाचे देवस्थान व दक्षिणेकडील मार्कंडेश्वर, चंद्रपूरचे महाकाली मंदिर ईत्यादी पवित्र तीर्थस्थानावर जाऊन तिथल्या देवालयात नतमस्तक होतात, केलेले संकल्प अथवा नवस फेडतात! आपल्या आई-वडिलांच्या अस्थींचे विधिपूर्वक विसर्जन करतात. अशाप्रकारे धार्मिक रितीरिवाजांची जोपासना करीत अति उत्साहाने हे भाविक धार्मिक स्थळांना भक्तिभावाने भेट देत असतात. यासाठी त्यांची जणू चढाओढच लागलेली दिसते, तीच गत नैसर्गिक पर्यटनस्थळांची व ऐतिहासिक स्थळांची!

अलिकडे यात मोठमोठया कारखान्यांचा, धरणांचा व टाऊनप्लॕनिंगच्या अद्ययावत आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या बंगलोर, चंदीगड अशा शहरांनाही भेटी देण्याचं वेड या पर्यटकांना लागलेलं दिसतं! नव विवाहित जोडप्यांना थंडहवेच्या ठिकाणांविषयीचे सर्वाधिक वेड असणे स्वाभाविकच आहे. वर्षातले ३६५ दिवस या निसर्गरम्य पर्यटन स्थळी जाणाऱ्यांनी तिथली पंचतारांकित व ईतर गल्लीबोळातील हॉटेल्स बुक करुन ठेवलेली असतात. आता या विज्ञानयुगात हे सहज शक्य झालेले आहे. तुमच्या हातातील मोबाईल व तुमच्या बँक खात्यात असलेला पैसा हे काम चुटकीसरशी पार पाडतात! मग तो प्रवास आकाशमार्गे, भू मार्गे, रोपवे असो की जलमार्गे करावयाचा असो या सगळ्या यंत्रणा तुमच्या पायाशी अक्षरशः लोटांगण घालतात.

याचा अनुभव मी नुकतात कर्नाटकातील बंगलोर, उटी व ईतर ठिकाणी जाताना घेतला. याच ठिकाणांना १९८२-८३ साली भेट दिली असता त्यासाठी एक दीड महिन्याच्या आधीच आरक्षण करावे लागले होते, तरीही अनेक प्रकारच्या गैरसोयी व अडीअडचणींचा सामना करावा लागला होता, तिरुपति देवस्थान, कन्याकुमारी व रामेश्वरला जातानाही अतोनात हाल झाले पण म्हणतातना हौसे पुढे या सगळ्या संकटांची गणतीच नसते! आमच्यातील काही महाभाग भले बिलंदर निघालेत.

त्यांच्या गाठीशी असलेला पैसा खाण्यापिण्यात फारसा खर्च न करता प्रसंगी एकच वेळ जेवण करुन ते शिमला, मनाली, दार्जिलिंग व डेहराडूनहून ब्लँकेट, शॉली व स्वेटर्स खरेदी करीत बसले व परत येताना ते अवजड ओझे सोबत असल्यामुळे काही ठिकाणांना भेटी न देताच परत फिरले. दिल्ली, आग्रा, फत्तेपूर शिक्री, कलकत्ता व नेपाळलाही याहून वेगळा अनुभव आला नाही. हे मित्र पर्यटनासाठी आले होते की मार्केटींग करायला आलेले होते हेच कळत नव्हते. त्यांनी खरेदी केलेल्या आग्र्याच्या ताजमहालाच्या प्रतिकृतींची वाटेतच वाट लागली हे सांगायलाच नको! दक्षिणेकडील प्रेक्षणीय व कलाकुसरीने अत्यंत मनोवेधक असलेल्या मिनाक्षीमंदिरात जाऊन दर्शन न घेता आपल्या बायकांसाठी कांजिवरम साड्या घेण्यातच हे महाशय मशगूल दिसले.

हे सगळे विचित्र असे चित्र बघून आपण उगाच या बावळटांसोबत आलो असे मला वाटल्यावाचून राहिले नाही. मद्रास, हैद्राबाद व गुजरातचाही अनुभव तोच! त्यावेळी आजच्यासारखी आॕनलाईन मार्केटींगची सोय नव्हती त्यामुळे त्यांचे खरेदीचे वेड फारसे खटकण्यासारखे नसले तरी अपेक्षेपेक्षा जरा जास्तच होते.

काही भावड्यांनी तर उसणे पैसे घेण्याचा सपाटाच लावला! आणि काही जणांचा व्यवहार पाहून मला *हौस बडी! खर्ची थोडी!* असा एक नवीनच अनुभव आला. रामेश्वरला घेतलेल्या शंखावर नाव नोंदवून घेण्यापासून तर विविध देवादिकांच्या मुर्त्या घेताना त्यांनी केलेली घासघीस पाहून तर नुसती किळसच आली! 

म्हणतातना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते! तिकडच्या दुकानदारांना महाराष्ट्रातून आलेल्या या पर्यटकांच्या महामुर्खपणाचा  अनुभव असल्यामुळे ते फारसे मनावर न घेता थंड डोक्याने वागत होते ही फार मोठी जमेची बाजू होती. आम्ही यातील काही मित्रांना अनेक प्रकारे समजावले, पण ते समजून घेण्याच्या मनःस्थितीत असायला तर हवेत ना? अलाहाबाद व वाराणसी (बनारस) येथील अनुभवाने तर या सर्वांवर कळसच गाठला तेथील एका नातलगाकडे जाण्याचा एका मित्राने आग्रहच धरला! त्याने सांगितलेल्या पत्यावर जाता जाता नाकी नऊ आलेत, शिवाय त्या यजमानांनी आमची एक ग्लास पाणी व एक कप चहावरच  बोळवण केल्यामुळे आमच्या मनात घोळत असलेल्या फराळ किंवा जेवण या कल्पनेचा निव्वळ बट्याबोळ झाला हे सांगताना आजही तितकीच लाज वाटते!

तर मित्रहो आजपर्यंतच्या आयुष्यात केलेल्या प्रवासात बरे वाईट अनुभव आलेत, हे जरी खरे असले तरी एकट्या दुकट्याने प्रवास करणेही फाजील धाडसाचे असते. मागे आमच्या एका मित्राने यवतमाळहून वरोरा येथे प्रवास करत असताना बळजबरीने सोबत घेतलेल्या मित्राला अवघड जागी अपघातात गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशाप्रकारे आनिच्छेने केलेल्या प्रवासात व नदी तलावात पोहत असताना, सेल्फी काढत असताना घडणारे अपघात आपल्याला प्रवास कसा करावा व कुठे करावा अथवा करु नये याचा योग्य धडा घालून देतात तरी पण आपण उठसूट प्रवासाला जातोच जातो.

प्रवासाला जाणे जर अपरिहार्य असेल तर अवश्य जावे, पण स्वतःच्या किंवा ईतरांच्या जिविताला हानि होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. विशेषतः बस व रेल्वेने प्रवास करताना खिडकीजवळ बसतांना शरिराचा कुठलाही भाग बाहेर न काढता नीट काळजीपूर्वक बसावे व ईतरांनाही तशा सुचना द्याव्यात. एक भावड्या आपल्या रडत असलेल्या बाळाला कडेवर घेऊन बाहेरचे दृष्य दाखवीत दारात उभा होता, तितक्यात विरुद्ध दिशेने आलेल्या वेगवान गाडीच्या आवाजाने ते लेकरु बिथरले व आपल्या बापाच्या कडेवरुन खाली कोसळले, ते भयानक दृष्य पाहून लोकांनी लगेच साखळ ओढली पण त्याला आता बराच उशीर झालेला होता.

शेवटी जन्मदात्याचा फाजिलपणाच त्या चिमुकल्या बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला! मित्रहो हजारो मैल प्रवास करुन व ऊंच ऊंच पर्रतशिखरांवर पर्वतारोहण केल्यावरही नखालादेखील धक्का न लागता सुखरुप आलेले पर्यटकही आहेत व निष्काळजीपणाने प्रवास करुन प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देणारे महामुर्खही आहेत. आता पंच्याहत्तरी पार केल्यावर व पर्यटनाचा भरपूर आनंद घेतल्यावर हा आप्पा आपल्याला काय शहाणपण शिकवतो असे तुम्हाला वाटणे सहाजिकच आहे, पण हा अनुभवाने आलेला शहाणपणा आहे.
आता या पर्यटन प्रकरणाचा शेवट करताना मला सर्वाधिक आवडलेली पर्यटनस्थळांची नावे सांगतो व थांबतो.

तर भावड्यांनो वर वर्णिलेल्या प्रेक्षणीय स्थळामध्ये नंबर एक म्हणजे वर्ध्याजवळील महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले *सेवाग्राम,स्व. विनोबा भावेनिर्मित पवनार आश्रम,  स्व, रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन तसेच पांडेचरी येथील अरविंद आश्रम कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक, कलकत्याजवळ स्व. विवेकानंद यांनी स्थापन केलेले बेलूर मठ, भाकरानांगल धरण  व वरोरा जि. चंद्रपूर येथे महान समाजसेवक स्व. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी, अंध, अपंग व मुकबधिरांची सेवासुश्रुषा करण्यासाठी स्थापन केलेले जगप्रसिद्ध आनंदवन हे होत.

आम्हाला दिल्ली येथील राष्ट्रपतीभवन व भाकरानांगल धरण आतून बघता आले कारण आमच्याजवळ तत्कालिन खासदार स्व.शफी साहेब तसेच दादासाहेब देवतळे यांची लिखीत शिफारसपत्रे होती. पण आनंदवन बघण्यासाठी कुठलीच अडचण नाही. आयुष्यात एक वेळा तरी आनंदवन अवश्य बघा!
बराय!
भेटू पुन्हा असेच कधीतरी!

तुमचाच

शिवाजीआप्पा साळुंके,
चाळीसगाव, जि. जळगाव.