दानत
‘दानत’
” वाईस कालवण मिळेलं काय ” ?
दारातून आवाज आल्यावर मी तिकडं बघितले ..
उन्हातनं रापलेला चेहरा काटक शरीरयष्टी ,.अँगावर धनगरी वेश ..
शेळ्या मेंढ्यासह परतीच्या मार्गाचे हे प्रवासी आहेत .हे माझ्या ताबडतोब लक्षात आले..
भल्या पहाटे पुर्वेला जाणारे पक्षी..संध्याकाळी पश्चिमेला परततात तसेच हे लोक देखील पावसापुर्वी आपआपल्या घरट्याकडे निघालेत ..
” आजोबा ..कालवाणा ऐवजी जेवूनच जा ..” !
” न्हाई लेकरा ..माझ्याकडली भाकरी शिळी ह्युईल “
” कालवणच दे ”
वरण ,बटाट्याची चटणी आणी लोणचं दिलं ..
आजोबांनी आनंदानं घेतलं ..
जवळच्या शेतात तिन चार जणांनी कोंडाळं करुन ते खाल्लं जेवण झाल्यावर ते आजोबा पुन्हा दारात आले ..
” लेकरा मी भिकारी न्हायी बरं का ” !
” अडलं नडलं की मागावं मानसानं अन् देन्याचीही दानत ठेवावी ” !
आजोबांचे हे वाक्य माझ्या मनात कायम प्रतिध्वनीत होत असते
एका चरवीतून आजोबांनी मेंढ्याच भरपूर दुध आणलं होतं .मी नको नको म्हणत चरवी दारातच ठेवली..
शेवटी नाईलाजाने पातेले आणले .तेव्हा आजोबा हसत होते ..
” आजोबा मी तुम्हाला भिकारी समजलोच नाही. मला माहित आहे तुम्ही धनाचे – आगर आहात आगर !
खरोखर सांगतो त्या अडीच तिन लिटर दुधाची घट्ट बासुंदी चार दिवस आम्ही खात होतो ..
आयुष्यात अशी बासुंदी पुन्हा कधीही बनलीच नाही ..
आजोबांना माझी आठवण येत असेल की नाही कोण जाणे !
पण लाल पिवळ्या फेट्याधारी व्यक्तीमध्ये मला त्यांचाच चेहरा दिसतोय.