झाडीबोली साहित्य चळवळीचा आढावा
झाडीबोली चळवळीची मुहुर्तमेढ जवाहरनगर येथे डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. घनश्याम डोंगरे आणि हिरामण लांजे यांच्या उपस्थितीत दि. ११ ऑक्टोबर १९९१ रोजी रोवली गेली. त्यानंतर लगेच डॉ. बोरकरांनी आपली जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या रेंगेपार (कोहळी) येथे १९ जानेवारी १९९२ ला पहिले झाडीबोली साहित्य संमेलन तत्कालीन आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या अध्यक्षतेखाली घेतले.
अध्यक्षासह सर्वानीच झाडीबोलीत आपली मनोगते व्यक्त केल्यामुळे हे एकदिवसीय संमेलन आकर्षणाचा विषय ठरले. दुसरे झाडीबोली साहित्य संमेलन साकोली येथे घेण्यात आले. याच वर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ‘झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन’ या विषयावर पीएच डी प्राप्त केली. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या संमेलनाचे अध्यक्षपद स्विकारावे लागले. पुढे सेंदुरवाफा येथे द. सा. बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे झाडीबोली साहित्य संमेलन पार पडले.
झाडीबोली साहित्य चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते डॉ. घनश्याम डोंगरे यांनी डोंगरगांव (पारडीबांध) येथे चौथे द्वि दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलन थाटामाटात घेतले. या संमेलनापासून पुढची सर्व संमेलने दोन दिवसाचीच व्हायला लागली. पाचवे संमेलन अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरवार यांच्या धाबेपवनी येथे पार पडले.
तर सहावे झाडीबोली साहित्य संमेलन सिरोली येथे आनंद मस्के यांनी घेतले. सिरोली येथील संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे याप्रसंगी ग. दी. माडगूळकरांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्या चमुने त्या पूर्ण कार्यक्रमाची चित्रफित तयार केली.
तसेच त्याच रात्री पहाटे दोन वाजता रेंगेपार (कोहळी)येथे जाऊन श्री गुरूदेव दंडार मंडळाची दंडारही चित्रित केली. माजी आमदार मार्तंड पाटील कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र होमराज कापगते यांनी घेतलेले सातवे झाडीबोली साहित्य संमेलन अनेक अर्थाने अर्थपूर्ण ठरले.
संमेलनाध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल यांचा ‘आदवा’ हा झाडीबोलीतील चारोळी संग्रह आणि अंजनाबाई खुणे यांचा ‘अंजनाबाईची कविता’ हा अस्सल झाडीबोलीतील कविता संग्रह यांच्यासह डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी सात वर्षांचा मागोवा घेणारी ‘सूर्याबान’ ही स्मरणिका या तीन पुस्तकांनी संमेलनाची शोभा शतगुणित केली.
या संमेलनाच्या आठ दिवस आधी १ जानेवारीला कवी ना. गो. थुटे यांच्या वरोरा शाखेने प्रकाशित केलेला ‘सपनधून’ हा झाडीबोलीतील चारोळी संग्रह झाडी चळवळीतील पहिला प्रकाशित झाडीबोलीतील संग्रह ठरला. अशाप्रकारे दहा संमेलने पार पडली.
या दशक पूर्तीनिमित्त डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी बोली चळवळीचा विस्तार महाराष्ट्रभर करण्याचा संकल्प सोडला. त्यांना मुंबई येथील शिवाजी रंगमंदिरात दिल्या जाणाऱ्या पु. भा. भावे साहित्य पुरस्काराचे निमित्त धरून झाडीपट्टीतील ७ शब्दसाधकांचा रेंगेपार (कोहळी) ते मुंबई असा वर्धा, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, पुणे, मुंबई असा प्रवास केला.

तेथे पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. बोरकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “कोकणीच्या रूपाने मराठीचा लचका तोडणारा बा. भ. बोरकर मी नाही. तर महाराष्ट्रातील सर्व बोलींना रेशमी बंधनात बांधायला निघालेला डॉ. हरिश्चंद्र बोरकर आहे.” हे ऐकताच संपुर्ण नाट्यगृह श्रोत्यांनी केलेल्या टाळ्यांच्या गजरात दुमदुमले. परतीच्या प्रवासात जळगांव येथे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त मराठी बोली साहित्य संघाचा जन्मदिवस ठरला.
अशाप्रकारे थाटामाटात २० संमेलने पार पडली. या २० संमेलनाच्या प्रसंगी डॉ. बोरकरांनी झाडीपट्टीच्या चारही जिल्ह्यातील साहित्यिकांना एक प्रपत्र पाठवून तब्बल ४४२ साहित्यिकांचा ‘झाडीपट्टीचे शब्दसाधक’ हा महाग्रंथ निर्माण केला.
या ग्रंथात केवळ झाडीपट्टीत राहणाऱ्या लेखकांचा परिचय दिला नसून झाडीपट्टीच्या बाहेर राहणाऱ्या प्रेमानंद गज्वी या सारख्या अनिवासी साहित्यिकांचा देखील परिचय दिला आहे. शिवाय ज्या महिला विवाहानंतर झाडीपट्टी बाहेर गेल्या अशा विजयाताई ब्राम्हणकर यांचाही परिचय दिला आहे.
स्वर्गीय डॉ. घनश्याम डोंगरे यांच्या स्मृतीला वाहिलेले जवाहरनगर येथील रौप्य महोत्सवी संमेलन अनेक अर्थाने वेगळे ठरले. याप्रसंगी स्मरणिका काढण्याचा नेहमीचा मळलेला मार्ग न स्विकारता ‘पूर्वाध्यक्षांची भाषणे’, पूर्व स्वागताध्यक्षांची ‘आदव्याची सुपारी’, सर्व पुर्वाध्यक्षांचा परिचय, सर्व संमेलनांचे प्रतिवृत्त याशिवाय झाडीबोलीतील शब्दसाधकांनी आपल्या झाडी कवितासंग्रहात झाडीबोलीच्या ज्या कविता समाविष्ट केल्या आहेत त्यांचा ‘झाडीबोलीत झाडीमाय’ असे पाच ग्रंथ विविध लेखकांनी संपादीत करून एक वेगळा विक्रम केला.
झाडीबोली चळवळीने केवळ संमेलनेच घेतली नाही तर नवीन शब्दसाधक शोधणे आणि त्यांच्याकडून पुस्तके लिहून घेणे यासाठी वेगवेगळे उपक्रम केले. प्रौढ शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या सहकार्याने नवेगाव बांध, सोमनाथ, जांभळी (सडक), आंभोरा इत्यादी ठिकाणी त्रिदिवसीय कथालेखन शिबीरे घेतली. इतकेच नाही तर अनेकदा काव्य प्रबोधन शिबिरे घेतली.
अशा काव्य शिबिरातून आपण कविता लिहायला लागलो, अशी स्पष्ट कबूली नरेंद्र नारनवरे, सुभाष धकाते यांनी दिलेली आहे. तसेच नागपूरला सुभाष चांदूरकर यांच्या पुढाकाराने द्विदिवसीय कविता लेखन संमेलन आणि कथा लेखन संमेलन आयोजित करण्यात आले.
या संमेलनाबद्दल नागपूरच्या वृत्तपत्रांनी दिलेला अभिप्राय मनोवेधक आहे. “जाण्यायेण्याचा आणि राहण्याचा कोणताही पत्ता न देता दोनशे किलोमीटर अंतरावरून दोन दोन दिवस रहायला हे साहित्यिक कसे येतात, या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर श्रोत्यांच्या उपस्थितीसाठी तिष्ठत बसलेल्या नागपूरातील साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांनी आत्मचिंतन करायला हवे.”
झाडीबोली चळवळीने केवळ बोलीचाच प्रचार केला नाही तर रंगभूमी व लोकरंगभूमी या क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. आपल्या दशक पूर्ती निमित्त राजूरा येथे पहिले झाडीपट्टी नाट्यसंमेलन घेतले.
याशिवाय नव्वदव्या दशकात पूर्णपणे संपुष्टात आलेली दंडार पुनर्जीवित करण्यात आली. त्यासाठी गावोगावच्या दंडार मंडळांना बोलवून रेंगेपार (कोहळी) आनंद माडगूळकर यांनी चित्रित केलेली दंडारीची चित्रफित दाखवण्यात आली. अशाप्रकारे ७ दंडार महोत्सव घेतल्यामुळे मागे दहा वर्ष ओस पडलेली मंडई बाजाराचे स्वरूप बदलून आता दंडार पर्वाला स्विकारती झाली.
याशिवाय डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी तमाशातील अश्लीलतेला हद्दपार करून खडीगंमत हा नवीन लोकनाटयप्रकार सुरू केला. त्यामुळे दशावतारी, तमाशा, भारूड यांच्याप्रमाणेच खडीगंमतला देखील भरघोस अनुदान मिळायला लागले.
शिवाय सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पारितोषिक योजनेतही आपल्या मधूकर बांते, मदन मस्ताना इत्यादी लोककलाकारांना सहभागी करून आर्थिक लाभ घेता आला.
झाडीबोली चळवळ संपूर्ण झाडीपट्टीशी सतत संपर्कात राहण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्नशील आहे. त्याकरिता झाडीपट्टीतील आठ शब्दसाधकांना घेऊन मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील मेंडाळा या वैनगंगा नदीच्या उगम स्थानापासून थेट वैनगंगा आणि वर्धा यांच्या संगम स्थळावर प्राणहिता नदीच्या पात्रापर्यंत आपल्या आठ शब्दसाधकांची वैनगंगा लोकयात्रा काढली. इतकेच नाही तर विविध क्षेत्रातील संशोधक व प्राविण्य पात्र व्यक्तींना घेऊन ‘वैनगंगा शोधयात्रा’ देखील काढली.
आता झाडीबोलीतील शब्दसाधकांनी भरभरून लिहायला सुरुवात केली आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ग्रंथांचे शतक पार करून १११ ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांच्या पाठोपाठ ना. गो. थुटे यांनी ग्रंथांचे अर्धशतक गाठले आहे. तर संतकवी डोमा महाराज कापगते या चौथी पर्यंत शिकलेल्या शब्दसाधकाने देखील ग्रंथांची साठी ओलांडली आहे.
झाडीबोलीत लेखन करणाऱ्या कवींमध्ये बाम्हणी खडकी येथील मुरलीधर खोटेले यांनी झाडीबोलीत तब्बल सहा कवितासंग्रहांची रचना करून यंदा त्यांचा सातवा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. हे झाडीबोलीतील एक एवरेस्ट शिखर आहे, असे म्हणता येईल.
यंदाचे वरोरा शाखेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झालेले झाडीबोलीचे ३२ वे झाडीबोली साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने ‘रौप्य बत्तिसी’ असून या संमेलनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी केवळ दोन वैशिष्ट्ये याठिकाणी उद्घृत करता येतील.
पहिले म्हणजे डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचे जन्मग्राम ‘रेंगेपार’ आणि ना. गो. थुटे यांचे जन्मग्राम ‘रेंगोडा’ या दोन गावांचा ऋणानुबंध पुन्हा अधोरेखित झालेला आहे. दुसरी बाब म्हणजे जेष्ठ कवी ॲड. लखनसिंह कटरे यांनी बोरकन्हार येथे दोनदा संमेलन घेण्याचा जो विक्रम केलेला आहे, त्याची ना. गो. थुटे यांच्या वरोरा शाखेने दुसऱ्यांदा संमेलन घेऊन बरोबरी साधली आहे.