आरसा मराठी भाषा कवीता
आरसा( अष्टाक्षरी )
प्रतिबिंब चेहर्याचे
कधी मोठे कधी छोटे
आरसाच दावितसे
कधी खरे कधी खोटे
साक्षी तो वर्तमानाचा
भूतकाळी ना रमणे
नसे जमत कधीही
भविष्यात डोकावणे
सुंदरता ती मनाची
नच दावितो आरसा
बाह्यरूपी सौंदर्याचे
प्रतिबिंबी कवडसा
धुरकट दर्पणात
मळकट मुख दिसे
स्वच्छ काचेत चेहरा
सुर्यासम तेज असे
सोळा शृंगार पाहूनी
पहा आरसा लाजतो
रूप सुंदरीचे तेज
जणू चंद्रमा भासतो
वय सोळावे असता
बने आरसा सोबती
दर्पणात न्याहाळता
रूप गर्विता लाजती
आरशात डोकावता
खुले ठेवा मनद्वार
नष्ट होती मुखवटे
निर्मळता आरपार
शैलजा करोडे ” काव्यशलाका “
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391