अश्रू तलावात मला शोधतो आहे

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

अश्रू

अश्रू तलावात मला शोधतो आहे

नानाभाऊ माळी

     ‘खाली पडल्याबरोबर गेलो असतो तर बरं झालं असतं!सगळ्या व्यापातून मुक्त झालो असतो!’… त्या व्यक्तीच्या ‘त्या ‘ शब्दांनी डोळ्यात टचकन अश्रू
आले होते!जीवन कसं असतं बघा ना!माणसं स्वतःविषयी असं बोलतांत तरी कसे? खरचं जगणं कठीण होऊन बसलयं का?……..

काल दिवसभर तप्त उन असल्यानें घराबाहेर पडलो नव्हतो!संध्याकाळी सूर्यनारायण पश्चिम दिशेला टेकतं होता!स्वअस्तित्व घेऊन हळूहळू डोंगरापलीकडे निघाला होता!अंधार पांघरतांना पश्चिमेची तांबूस छटा पुसट होत चालली होती!सूर्य मावळल्यावर मी ही घराबाहेर पडलो होतो!मोकळं, हलकं वाटत होत!सिमेंटचे रस्ते अंगातली उष्णता बाहेर फेकीत होते!रस्त्याने चालतांना,हाताच्या मुठीत दुडूदूडू चालणाऱ्या साडेतीन वर्षाच्या नातूचा हात होता!त्याच्या मनोवेधक खट्याळ बाल लीला सुरूच होत्या!हळूहळू अर्धाएक फर्लांगं चाललो असेल!रस्त्यावरचं आमच्या जेष्ठ नागरिक संघांचे मित्र भेटले!त्यांच्याशी गप्पा मारत होतो!नातू बोट ओढून पुढे चालायचा प्रयत्न करीत होता!मी त्याचं मनगट धरलं होतं!रस्त्यात गर्दी होती!वाहने जात येतं होती!आमच्या गप्पा सुरूच होत्या!नातूश्री माझ्या सभोवती उड्या मारत होता!

पाच मिनिटांनी अजून एक ओळखीची व्यक्ती आली!माझे ओळखीचे नव्हते!आमचे जेष्ठ मित्र यांचे ओळखीचे होते!त्यांच्याशी ओळख झाली!पाच दहा मिनिटे त्यांच्याशी गप्पा मारत होतो!नातू कंटाळला होता!त्याला वर उचलून घेत कमरेवर बसवलं होतं जणू!नातूही लाडाने बसला होता!आमचे जेष्ठ मित्रास फोन आला तसं ते निघून गेले!मी आणि नुकतीच ओळख झालेले त्या नवीन सद्गृहस्ताशी गप्पा सुरु होत्या!त्यांच्या बोलण्यातून खोलवर हृदयातली जखम भळभळत वर यावी तसें बोलत होते…..

‘…..दोन वर्षांपूर्वी मी या भागातला नावाजलेला प्लंबर होतो!२० ते २५ माणसं माझ्याकडे कामाला होती!संपूर्ण पुण्यात बांधकाम जोरात सुरु आहेत!गवंडी सोबतच प्लंबरचंही तेवढंचं महत्व आहे!अनेक ठिकाणी कामं सुरु होती!…..!’

      ‘…..मला दोघी मुलीचं आहेत!दोघींची लग्न पार पडलेली आहेत!माझा व्यवसाय व्यवस्थित सुरु होता!ऐके दिवशी रविवार होता!रविवारी सर्व कामांना आठवड्याची सुटी असतें!मी ही जेवन करून दुपारी हलत्या खुर्चीवर बसलो होतो!ओट्यावर ती खुर्ची छानशी डुलक्या घेत होती!अचानक काय झालं मला कळलंही नाही!मी खुर्चीमागे जोरात जाऊन पडलो होतो!डोक्यातून भळभळून रक्त येतं होतं!मेंदूला जोरात मार बसल्यानें,हातपाय वेडेवाकडे व्हायला लागले होते!घरच्यांनी क्षणाचाही विलंब न करता दवाखान्यात हलंविले!तेथे कळलं
पॅरालिसिसचां झटका आला आहे!त्या हॉस्पिटलमध्ये तात्पुरती ट्रीटमेंट केल्यावर मला सरळ कर्नाटक राज्यातील निपाणीला हलविले…!’

         ‘……निपाणीच्या
हॉस्पिटलमध्ये १५ दिवस होतो!योग्य ट्रीटमेंट सुरु होती!रक्त पातळ व्हायच्या,अजूनही दुसऱ्या गोळया घेऊन घरी आलो!सहा महिने अंथरुणात पडून होतो!काही दिवसांनी काठी टेकून पाय ओढत चालू लागलो!एक एक दिवस जात होते!प्लंबरचं कामं करून हातावर पोट भरणारा मी!हाताशी असलेले पैसे संपले!धड चालता येईना!प्लंबीगचं कामं सुटलं!पोटासाठी काय करणारं होतो मी ? जवळचे लोकं दूर गेली!पैशावर प्रेम करणारी माणसं माझी अवस्था पाहून दूर गेलीत!प्लंबीगचां कॉन्ट्रॅक्ट गेला! हात पाय थोडे थोडे उचलू लागलो!पोटासाठी उचलणे भाग होतं!कुठे कामं मिळतात का शोधू लागलो!घरचे जाऊ देत नव्हते!स्वाभिमानी मनास पटत नव्हतं!गेल्या सहा
महिन्यापासून एका सोसायटीच्यां बिल्डिंगमध्ये रात्रपाळीचां वॉचमन म्हणून काम करतो आहे..!’

    ‘….दोन्ही लग्न झालेल्या मुली घरी येतात तेव्हा त्यांच्या हातावर हक्काने  हजार पाचशे रुपये ठेवतो!मुली नको नको म्हणतात पण बाप आहे ना मी त्यांचा!स्वतः कमावून दिलेल्या पैशाचं समाधान वेगळंच मिळतं!मी आज जीवंत आहे!मेंदू अजूनही अनबॅलन्स होतो!पण नेटाने उभा आहे!दादा खरं सांगा माझी काय चूक होती? चालता बोलता सगळं बदलून जावं? मी मेल्यावर,वरती गेल्यावर परमेश्वराशी भांडणार आहे!माझी  काय चूक झाली होती? ही शिक्षा दिली मला!मला जीवंत ठेवण्यापेक्षा तेव्हा खाली पडल्याबरोबरचं नेलं नाही!आता होणाऱ्या यातनेतून सुटलो असतो!
   
         रात्रीचे पावणेआठ वाजले होते!त्यांची रात्रपाळीची ड्युटी आठ वाजता होती!मला नमस्कार करून हळूहळू निघून गेले!मी त्यांच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहात उभा होतो!नातू दोन्ही हातांच्या कुशीत बसला होता!माझे पाणावलेले डोळे पुशीत बोलत होता,’ बाबा तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय!चला घरी मम्मी, पप्पा, आई वाट बघत असतील!तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली देखील!आम्ही घरी यायला निघालो होतो!डोळे मात्र डबडबलेलेचं होते!सुन्न मनाने घरी पोहचलो होतो!

नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०७ मे २०२४

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *