लढवंय्या हरिहर गड
लढवंय्या हरिहर गड
लढवंय्या हरिहर गड
(हर्षवाडी,ता.त्र्यंबक,जि.नाशिक)
(भाग-०२)
नानाभाऊ माळी
वार झेलीत छातीवरीं
शूर वीर लढतं होता
तळपत्या तलवारीने
तो शत्रूला फाडतं होता!
लढाई होती निष्ठेचीं
ध्वज भगवा फडकत होता
मर्दानंगीच्या कातळावरीं
तोफगोळा धडकत होता!
किल्ला हरिहर पोलादी
सूर्यप्रकाश पाहात होता
ढाल तलवारी तळपत हाती
शाहीर पोवाडा गात होता!
हरिहर होता मुकुटमणी
वारा ढोल वाजवीत होता
मर्दानी तलवारीतून मर्द
सत्ता गाजवीत होता…!
सह्याद्रीचा शूर गर्जला
आमुचा शिवबा राजा होता
उंच पाषाण कातळावरीं
तो इतिहास ताजा होता!

किल्ला शक्ती केंद्र असतं!काळजात ठायी ठायी भक्ती असते!शक्ती आराधना किल्ल्यातून होत असते!सुरक्षित किल्ल्यातून शक्ती दिसत असते!काही पटीने हिम्मतीची ताकद दिसत असते!आम्ही अशाचं शक्तीस्थळावर गेलो होतो!नसानसातून अंगी रक्त सळसळणाऱ्या अतिकठीण गिरीदुर्गावर गेलो होतो!आमच्या लढवंय्या पूर्वजांच्या शक्तीस्थळावर गेलो होतो!जाज्वल्य राजनिष्ठा जपलेल्या आमच्या स्फूर्तीस्थळी गेलो होतो!आम्ही पुन्हा मनगटात दम भरण्यास गेलो होतो!स्वतः स्वतःस जाणण्या गेलो होतो!देशभक्तीची उर्मी भरण्यास गेलो होतो!आमच्या धमनीत श्वास भरण्यासाठी गेलो होतो!महाराष्ट्रातील कठीण किल्ल्यावर गेलो होतो!३६७६ फूट उंच किल्ल्यावर गेलो होतो!शत्रूस धडकी भरवणाऱ्या उभट कातळगडावर गेलो होतो!
मनात धाकधूक होती!छातीत धडधड होती!अंगावर शहारे उठले होते!तरीही आमची निष्ठार्पित शक्ती स्थळावर गेलो होतो!मी कोण आहें याचा मागमूस घेण्यास गेलो होतो!कानी आवाज धडकत होता!तोफांचा ‘धडाडधूम’ कानठळ्या बसणारा भास होत होता!पावसाने धुमाकूळ माजवला होता!पाण्याचा लोंढा वाहात होता!बिकट, विपरीत परिस्थिती होती!आम्ही एक मिनिटही विश्रांती न घेता स्वप्नस्रोतावर गेलो होतो!पावसाळी विपरीत परिस्थितीतं सह्याद्रीच्या कठोर पाषानी गिरीशिखरावर गेलो होतो!पावसाळी वाऱ्याला समोरे जात,चाल करीत एक एक पावलं पुढे पडत होती!
आम्ही नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यातील हर्षवाडी गावाच्या अति उंच गिरीदुर्ग चढाईला निघालो होतो!नाशिक पासून ४२ किलोमीटर लांबवर असलेल्या किल्ल्यावर गेलो होतो!आम्ही हरिहर गडावर गेलो होतो!आम्ही हर्ष गडावर गेलो होतो!श्रीविष्णू महादेवाचं एकत्ररूप हरिहर गडावर गेलो होतो!छातीत धडकी भरवणाऱ्या उंच उंच गगनओढ गिरीदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो!सहयाद्री पर्वत रांगेतल्या निसर्गसाधनेतं एकचित्त बसलेल्या योगी हरिहर किल्ल्यावर गेलो होतो!
रविवारी ०६ जुलै २०२५ च्या पहाटे,चिंब भिजवणाऱ्या पावसात आषाढी एकादशी होती!पंढरपूर निवासी आराध्यदैवत श्रीविठ्ठलवारी दिवशी,उपवासाच्या दिवशी आत्मिक श्रद्धेनें पूजलं होतं!आम्ही शक्ती देवतेला,वन देवतेला,हर महादेवाला अन छत्रपती शिवरायांना नमन करुन झुंजूमुंजू प्रात सकाळी ०६ वाजता चढाईला सुरुवात केली होती! पायथ्यालाचं वनविभागाचा ‘हरिहर गड’ कलाकृतीतं विसावलेला फलक दिसला होता!तेथून एक एक पावलं टाकीत निघालो होतो!अंगावर येणारी उभट चिखलपायवट तुडवत निघालो होतो!
विंचूकाटा,साप,नरभक्षक प्राण्यांच्या भीतीसं तोंड देण्याचं सामर्थ्य हर हर महादेवाने दिलं होतं!आम्ही चढाई करीत होतो!आम्ही चालत असलेल्या खोलगट दगडी मतंट पायवाटेतून पाण्याचा लोंढा वाहात होता!मातटं तपकीरी पाण्याचा लोंढा उताराकडे आपल्याचं नैसर्गिक धुंदीत गतिमान होतं वाहात होता!कडेकडेने जंगलातील झाडं पावसानतं अंघोळ करीत होती!हवेच्या झूळकीवर हलत,डुलत होती!आम्ही जिद्दी होतो,पाऊसही जिद्दी होता!दोघांचीं मैत्रीपूर्ण जिद्द होती!अंगावर पावसाच्या धारांना स्वीकारीत गड चढणं सुरूचं होतं!

सभोवती हिरवाईनें मोहिणी घातली होती!जिकडे बघावं तिकडे उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे दिसत होते!लांबवर सह्याद्रीचीं उंच रांग दिसत होती!जंगलांनी सुंदर पोशाख घातला होता जणू!वाऱ्याच्या संगीतावर निसर्ग हसत हसवत होता!आवाहन,आव्हान करीत होता!मानवी मनाला निसर्गाची ओढ लागलेली असते!अनंत कोडें सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतो!माणूस हरता हरता जिंकण्यासाठी लढत असतो! हरण्यातून जिंकण्याची जिद्द निर्माण होते!मानवाचा निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न सुरूचं असतो!डोळे विस्फारणाऱ्या विशाल तत्वासमोर लढणे कठीण असूनही गुढतेवर मार्ग काढीत विनम्र होतं जिंकत असतो!…
आम्ही उभट पर्वतरांग चढत होतो!पावसाला सामोरे जातं कुठेतरी घसरड्या ठिकाणी थोडेफार घसरनं सुरू होतं!पून्हा चढाई सुरू होती!वेडेवाकडी खडकाळ पायवाट वरती चढावर वर वर जात होती,चढण्यास प्रवृत्त करीत होती!आम्ही वर वर चढत होतो!पावसाळी धुक्यात खालचं दिसत नव्हतं!एखादा खळाळता धबधबा दिसत होता!काही अवघड ठिकाणी लोखंडी कठडें, रेलिंग लावलेले होते!आधार घेत नेटाने चढाई सुरू होती!अन अचानक काळा नागफणी कातळ पाषणात!उभट कातळातं पायऱ्या कोरलेल्या दिसल्या होत्या!
मान उंचावून पाहात होतो!उभट म्हणजे घरत शिडी लावावी असा तो उंच पाषाण दिसत होता!८५ तें ९० डिग्रीतं त्या उभट कोरलेल्या पायऱ्या पाहून पाऊस असूनही दरदरून घाम फुटला होता!त्या कातळ पायऱ्यांवरून चढाई करायची होती!छातीत धडकी भरेलं अशा कातळावर पायऱ्या कशा कोरल्या असतील बरं?? अंगी थरकाप होता!भीती होती!वरती चढावं की चढू नये अशा संभ्रमात होतो!त्यात पाऊस जिद्दीला पेटला होता!डोळ्यासमोर छत्रपती शिवराय दिसल्याचा भास झाला तसा ‘जे होईल तें लढाईत मागे हटायचं नसतं!’ छत्रपती शिवरायांची शिकवण आठवली होती! ‘जय शिवराय!’. म्हणत कातळ कड्यानें दाखविलेल्या भीतीला स्फूर्तीने मार्ग दाखवला होता!उभट पायऱ्यांना स्पर्श केला तसें पावलं पुढे पडू लागली होती!आम्ही उभट पायऱ्या चढायला सुरवात केली होती!
छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची ताकद दिली होती!शत्रूवरं जरब बसवीत रयतेचं लोकराज्य केलं होतं!आदर्श राजांचा,महापराक्रमी राजांचीं प्रचंड स्फूर्ती आम्हा मावळ्यात संचारलीं असावी!नसानसात रक्त सळसळू लागलं होतं!’जय भवानी, जय शिवाजी’ स्फूर्ती,शक्ती मुखा मुखातून निघतं होती!अंगी बळ आलं होतं!पावसाला अन भीतीला न जुमानता, उभट कड्यातील पाषाणी पायऱ्या चढून जात होतो!साधारण १८० पायऱ्या चढून गेलो असेल!वळणं घेत उभट पाषाणी पायऱ्या कातळा आतून बोगद्यातं गेल्यासारख्या पुढे गेल्या होत्या!आम्ही चढत महाद्वार जवळ येऊन पोहचलो होतो!
साधारण २०० फूट उंच कातळ कड्यावरील पायऱ्या प्रत्येक ट्रेकरची परीक्षा घेत होत्या!निडरतेची चाचणी घेत होत्या!सेल्फ कॉन्फिडन्सचीं टेस्ट घेत होत्या!संयमांची परीक्षा घेत होत्या!पायऱ्यांवर चढण्यासाठी बोटांना आधार मिळावा म्हणून छोटे छोटे खड्डे कोरले होते!आम्ही त्यात बोट अडकवून वर चढत होतो!मनावर जिंकण्याची ताकीद देत वर चढलो होतो!वरून खाली पाहिले असता खोल खोल दरी अन उभट कडा दिसत होता!मनावर नियंत्रण ठेवीत पावसाळी धुक्यात लपून बसलेंल्या खोल दरीला पाहात होतो!
भक्कम महाद्वारातून पुढे निघालो होतो!लकडी दरवाजा अतिशय मजबूत अन दणकट होता!पआम्ही पुढे निघालो होतो!पाषानीं कडा कोरून पाय रस्ता तयार केला होता!डाव्या बाजूला उभट कड्याखाली खोल खोल दरी हिरवाईत,पावसाच्या धुक्यात लपून बसली होती!आमचा आत्मविश्वास दुणावला होता!त्यातून पुढे निघालो होतो!अनेक वेडीवाकडी वळणं पार करीत उंच उंच गड चढत होतो!पावसात भिजत होतो!रेनकोट असूनही उपयोग झाला नव्हता!वाऱ्यासोबत पाऊस मोठंमोठया थेंबानी झोडपून काढीत होता!रेनकोटातून जरी भिजलो होतो पावसाच्या कानफट्टी धारांपासून सुरक्षित होतो!
आम्हाला वेध लागले होते त्या बालेकिल्ल्यावरील सर्वोच्च स्थळाचं!चालणे थांबलं नव्हतं!पाऊस थांबला नव्हता!आमची जिद्द सिद्धीकडे वाटचाल करीत निघाली होती!आम्ही वेड्यावाकडया कच्च्या पायवाटेने निघालो होतो!हळूहळू एका सफाट भुईभागावर,टेबल लँडवर पोहचलो होतो!निसर्गाचा स्वर्गीय कलाविष्कार नजरेस पडला होता!पर्वतीय गिरी शिखरावरील अतिशय उंच भागावर किती किती मोठा तलाव होता तो!!!पावसातं काटोकाट भरून कदाचित ओसंडून खोल दरीत उडी घेत असावा!विशाल धबधबा काळ्या पाषाणी काड्यास धडकत, धडकत दुग्ध फेसाळत खोल दरीत अंग सोडून देत असावा!अतिशय सुंदर, सुरेख निसर्गनजारा डोळ्यातल्या पापणीतून पिवून घेत होतो!स्वर्गीय सुखाची अनुभूती डोळ्यात भरून घेत होतो!
तलावाशेजारीचं महादेवाचं मंदिर दिसलं!देवाधि देव महादेवाचं मंदिर होतं!वाकून श्रद्धेनें दर्शन घेतलं होतं!तेथून जवळचं श्रीहनुमान मंदिर होतं!श्रीहनुमानास शक्ती केली होती!त्रिनेत्रधारी भगवान महादेव अन गदाधारी श्रीहनुमानजींचा कृपाप्रसाद हृदयातंरी ठेवून पुढील चढाईला सुरवात केली होती!वेडीवाकडी वळणं पार करीत भर पावसात अवघ्या १५ मिनिटात आम्ही हरिहर गडाच्या सर्वोच्च ठिकाणी चढलो होतो!पाषाणी सर्वोच्च ठिकाणी चढतांना भीती वाटत होती!घसरून पडण्याची भीती होती!दगडाला व्यवस्थित धरून हळूहळू हात पायांचं संतुलन साधत वर चढलो होतो!
आम्ही हरिहर गडाच्या सर्वोच्च ठिकाणी उभे होतो!आम्ही छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज फडकवीत होतो!भर पावसात आमची जिद्द जिंकली होती!उमेदीला आनंद झाला होता!आम्ही *निसर्ग सुंदर हरिहर गड सर केला* होता!महाराष्ट्रातील एक अवघड किल्ला चढलो होतो!निसर्गाच्या कृपेनें, आशिर्वादामुळे हरिहरगड चढलो होतो!आम्ही धाडस करुन वर चढलो होतो!साधारण दिड-पावणे दोन तासात मोहीम फत्ते केली होती!
आम्ही यादवकालीन हरिहर गड जिंकला होता!निझामाकडून शहाजी राजांनी जिंकलेला किल्ला नंतर मोघलांकडे गेला होता!पुन्हा छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून गोंडा घाटावरील व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भक्कम किल्ला जिंकला होता!नंतर मोघल, पेशवे शेवटी इंग्रजांच्या ताब्यात गेलेल्या किल्ल्यासं कोरीव दगडी पायऱ्यांच्या प्रेमात पडलेल्या इंग्रज सेनापतीने उध्वस्त न करता तसाच नैसर्गिक कोरीव केलेल्या अवस्थेत ठेवला होता!आता भारत सरकाराधीन असलेल्या कठीण किल्ला जिंकला होता!जव्हारला जातांना त्र्यंबक रोडच्या निरगूडपाडाच्या अन हर्षवाडीच्या ग्रामपंचायत अधीन असलेला हरहुन्नरी हरिहर गड जिंकला होता!
पावसात रेनकोटातून घामाघून झालो होतो!घाम गाळल्याच फळ म्हणून यशस्वी झालो होतो!प्रसन्नता होती!किल्ला जिंकल्याचा असीम आनंद अविस्मरणीय असा होता!आमच्या धाडसी प्रयत्नांनीं, मातृ-पितृ यांच्या आशिर्वादानें, गुरुजनांच्या सतसंस्कारांमुळे, हितचिंतकांच्या शुभेच्छा घेऊन,ईश्वरीं कृपेचा प्रसाद मिळाल्यामुळे आम्ही हरिहर गडाचा ट्रेक यशस्वी पार पाडला होता!मनी अतूट श्रद्धा असेल,स्वतःस झोकून देण्याची भावना असल्यास ध्यासपर्वाचा उजेड निश्चित असतो! अवघड गड चढल्याचा अनुभव आषाढी एकादशी दिवशी घेतला होता!निसर्ग सानिध्यात मन, बुद्धी, प्रकृती,शुद्धारोग्य,सुदृढतेचा मंत्र घेऊन धमणीतं ऊर्जा भरून आलो होतो!आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो!
!जय हरिहर!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८ जुलै २०२५