सुख-दुःखाची अनुभूती
नानाभाऊ माळी
माणसाचा प्रवास जन्माने सुरू होतॊ!जन्म होत असतांना देहात प्राण ओतला जात असावा!प्राण श्वासातून सिद्ध होत असावा!देहाची हालचाल अन आवाजातून आपण जीवंत आहोत हे कळत असावं!शरीरातील धगधगती जीवंत वात जन्मापासून अखंड तेवत असतें!जन्म आनंद देत असतो!सुख देत असतॊ!अतृप्तीकडून तृप्तीकडे वाटचाल असतें!वाटचालीत नातेसंबंध जन्माने प्राप्त होतात!काळासंगे सुसंगत वाटचाल म्हणजेचं प्रवास असतो!अनेक प्रसंगातून हा प्रवास रंगत जातो!माणूस यातून जात असतो!
घटना अन प्रसंगातून माणूस शिकत असतो!संस्कारीत होत असतो!घडत असतो!जगण्याची एक एक पायरी चढत असतो!चढ-उतरांचां आलेख खाली-वर होत असतो!सुखातून आनंद मिळत असतो!आनंद वाटत माणूस जगत असतो!कधी दुःख देणाऱ्याही घटना घडतात!सुख-दुःखाच्या अनाकलनीय झोपाळ्यावर बसून माणूस जगत असतो!सकारात्मक वागत असतो!सुख शोधण्या पळत असतो!मनुष्य जीवन अधांतरी झोपाळा असतो!
जन्म आनंद आहे!अनेक अडथळे पार करीत उभं राहायचं असतं!आत्मिक समाधान मिळवायचं असतं!यशस्वी होणे आनंद देत असतं!परीक्षेत पास झाल्याचा अत्यानंद मिळतो!नोकरी लागणे अत्यानंद आहे!शेतातून पीक घरी येणं कष्टाचं फळ आहे!विवाह आनंदाचा क्षण असतो!सर्वचं आपल्या मनाप्रमाणे घडत नसतं!म्हणून दुःख आनंदा शेजारी उभंच असतं!चटके, फटके देत शिकवत असतं!मग यालाचं जीवन म्हणावं का?
व्यवसायात नेहमीचं तोटा होत असंतांना एखादा व्यक्ती अतिशय निराश होतो!अयशस्वीचा शिक्का त्याच्या माथी बसतो!हतबल झाल्यासारखं वाटत असतं!आतून उन्मळून पडतो!हे आंतरिक दुःख असतं हतबलतेच!दुःख मोजण्याचं एकक तरी काय असतं मग?एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर अपार दुःखाचं शिखर गाठलं जातं!असह्य वेदना हृदयातून बाहेर पडतात!ओक्सा बोक्सी रडून,अश्रू गाळून दुःख हलके करता येतं!मानसिक, शरीरिक, कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रात हानी पोहचवणार ‘दुःख’ कुणाला हवं असतं बरं ?
कुणालाही नाही तरीही दुःख समोर वाढून ठेवलेलं असतं!कसं ते बघा…..
आम्ही प्रवासी या जगाचे
प्रवास आपण करुनी घ्यावा
सुख-दुःख तोलूनी मापूनी
शब्द सोबती घेऊनि जावा!
कुणी वाढतो सुखामृत
तृप्तीढेकर देत राहावा
कुणी वाढतो ताटी दुःख
नीलकंठी ते पचवूनी घ्यावं !
जन्माने हो आनंद होतो
स्वर्ग सुखास सोबत न्यावा
शरीर सोडूनि जातो प्राण
देवाला का दोष द्यावा?
सुख-दुःखाचा मोडूंनी काला
जीवन म्हणती त्यांसी देवा
आपुले परके सोडूनि जाती
दोष तरी हो कुणास द्यावा?

आम्ही अशाचं सुख दुःखाच्या गावी गेलो होतो!आनंद अन दुःखाची अनुभूती घेत स्वतःस कळण्या गेलो होतो!दिनांक २० डिसेंबर २०२४रोजी, एकाचं दिवशी आनंद अन दुःखाचीं अनुभूती घेतली!नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एका विवाह समारोहाला गेलो होतो!विवाह मंगलमय सोहळा होता!आनंद अन पवित्र सोहळा होता!भटजी काकांच्या मुखातून पवित्र मंगलाष्टक बाहेर पडत होते!पवित्र शुभ अक्षदा हाती घेत वधू-वरांच्या डोक्यावर टाकल्या जात होत्या!सभागृह भरून गेलं होतं!आम्ही वधू-वरांना आशीर्वाद दिला!आनंदी वातावरणात विवाह सोहळा संपन्न झाला!दोन नाते!दोन धागे!दोन व्यक्ती, पाहुण्यांच्या साक्षीने, समत्तीने एक झाले होते!एकजीव झाले होते!विवाह सुखाचा सागर होता!…
दुपारी विवाह सोहळा पार पाडून,सुखाचीं अनुभूती घेत प्रवासाला निघालो होतो!पुण्याला निघालो होतो!नाशिक जिल्ह्यातील सटाना तालुक्यात ‘अंबासन’ नावाचं एक छोटंसं गावं आहे!सूर्य अस्ताला गेला होता!खडबडीत रस्ता आमच्या गाडीला खड्ड्यांचं दर्शन करून देत होता!गाडीचा वेग मंदावला होता!अंधार पडला होता!अंधाऱ्या रात्री आम्ही ‘अंबासनला’ पोहचलो होतो!
अंबासन दुःख सागरात बुडाले होते!अश्रू थेंबातं डोळे भिजतं होते!पुण्यात आमच्या एका सहकारी बांधवाच्या पत्नीचं निधन झाले होते!अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी देह मागे ठेवून,निरोपाची सांगता करीत स्वर्गलोकीचा प्रवास आरंभिला होता!कै.ताईचें अंत्यसंस्कार त्यांच्या गावी अंबासनला तीन दिवसांपूर्वीच झाले होते!आम्ही कुटुंबाचं दुःख हलके व्हावे म्हणून सांत्वन करायला गेलो होतो!
दुःखाची व्याप्ती खूप मोठी होती!संपूर्ण कुटुंब कोलमडून पडलं होतं!दुःखी कुटुंबाची अवस्था पाहतं स्वतःस आवरू शकलो नाही!कुटुंबाचं दुःख हलके करण्यासाठी गेलो होतो!स्वतः पाणावल्या डोळ्यांनी दुःखी झालो होतो!रात्रीच्या अंधारात रस्त्याला लागलो होतो!जन्म आनंद देत असतो!देहावसान दुःख देत असतं!जन्म सत्य असतो!मृत्यू देखील सत्य असतो!दोन्ही सत्यातून मानवी जीवन जात असतं!वेळ येणारी असतें!नंबर मागे-पुढे असतो!जन्माने प्रवासाची सुरुवात होते!मृत्यूने सांगता होते!ही सांगता माणसाला वेदनादायी असतें!दुःख देत असतें!अश्रूतं भिजवीत असतें!
जीवनकाळ स्वप्न असतं!स्वप्नांत रंगलेल्या माणसाला मृत्यू जागे करीत निघून जातो!करुणेचां आभास करून निघून जातो!सुख झूलवत असतं!दुःख तडफडायला लावतं!दोन्ही अनुभूती असतें!जीवन सजत असतं!सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर प्रवास सुरू असतो!मृत्यू सत्य आहे!त्याला समोर ठेवून जगत राहायचं!मंगल मांगल्य दिवस उगवत असतो!सकारात्मक सात्विकता खोट्या लोभावर मात करीत राहतें!मानवी जीवन सुख दुःखाचा अनाकलनीय प्रवास आहे!सुख उपभोगून,दुःख पचवून जन्माच सार्थक करीत निरोपापाशी येऊन पोहोचायचं!Think positive!..act positive!..be positive जन्म सिद्ध करायचा असतो!आम्ही एका दिवसात सुख-दुःखाचा अनुभव घेत पुणे गाठलं होतं!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२४ डिसेंबर २०२४