महात्मा फुले यांना जाहिर सभेत महात्मा ही पदवी बहाल
दि. ११ मे १८८८ मुंबई येथे जनतेने महात्मा फुले यांना जाहिर सभेत महात्मा ही पदवी बहाल केली.तसेच ११मे १९१५ अहमदनगर येथे सत्यशोधक समाजाचे ५वे अधिवेशन संपन्न झाले. तो हा आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस. त्या निमित्त सत्यार्थ दीपिका ह्या माझ्या ११एप्रिल २०२४ रोजी म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि.अहमदनगर येथे प्रकाशित स्व रचित कविता संग्रहातील ही कविता
तरी तुम्हा वंदियले
जोती फुले तुम्ही दिले
आम्हा ज्ञान रुपी फुले
सत्य शोधण्याचे धडे
सारे आणखिन दिले॥धृ॥
उशिराच तेही सारे
आम्हालागी उमजले
रुढी परंपरांमधे
सारे अजूनी रुजले॥१॥
शिक्षणाचे सारे धडे
सावित्रींना तुम्ही दिले
सावित्रींनी आम्हा दिले
आम्ही सारे गिरविले॥२॥
सारे गिरविले आणि
मस्तकात रुजविले
अंधश्रद्ध अज्ञानाला
तरी दूर नाही केले॥३॥
जन्मदिनी स्मृतीदिनी
तरी तुम्हा पुजियले
फुलहार ही अर्पिले
तरी तुम्हा वंदियले॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव .
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.


