खिडकी
खिडकी
एक खिडकी जरुर असावी,
घराला आणि मनाला.
जी जोडून ठेवेल सदैव,
जीवाशी जगाला.
श्वास जेव्हा गुदमरु लागेल,
घरात आणि शरीरात.
खिडकीच येईल कामाला,
ती प्राण फुंकेल देहात.
सताड उघड्या ठेवा तुम्ही,
शक्यतांच्या खिडक्या.
भलेही कोसळो कितिही,
अपेक्षांच्या माड्या मोडक्या.
हसून बघाल खिडकीतून,
तर जग आनंदी दिसेल.
रडत बघाल खिडकीतून,
तर जग तुमच्यावर हसेल.
किलकिली करावी खिडकी,
डोकावून घ्यावं बाहेर.
मारावा फेरफटका हृदयातून,
जीवाचं तेच तर माहेर !
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.
(९४२३४९२५९३).