काव्य महोत्सव कविता
कवि चंद्रकांत जोगदंड यांच्या चैत्री पालवी काव्य महोत्सव पुणे येथे गेलो असताना तप्त उन्हात रस्त्यावर काही विक्रेत्यांना पाहिल्यावर सुचलेली कविता
‘एका चतकोर भाकरीसाठी’
संजय धनगव्हाळ
ऋतू कुठलाही असु दे
ऊन्हाळा हिवाळा पावसाळा
पाय पळत असतात
भाकरीसाठी वळत असतात
वादळ वारा असला तरी
वाट कष्टाची धरावी लागते
घामाच्या धारा ओघळताना
तप्त उन्हाची पर्वा करायची नसते
कधी पावसात ओलं व्हायचं
कधी थंडीत कूडकुडायचं
चटके अंगावर घेताना
रोज हातांना राबवायच
हाताना राबवल्याशिवाय
भाकरीचा प्रश्न सुटत नसतो
दोन घास पोटात गेल्यावर
तेव्हढ्या पूरताचा सण असतो
दिवस कसेही असले तरी
वाट कष्टाची धरावी लागते
दोन पैसे हाती आल्यावरच
भाकर तव्यावर शिजते
कधी कधी विश्रांतीला
सावलीही दिसत नाही
कोरड्या घशाला पाणी मिळत नाही
थंडी वाजली की पांघरून घ्यायचं
पोटासाठी पायांना उन्हात जाळायचं
सुख दुःख आजारपणाचा तर
कधीच विचार होत नसतो
जगण्याच्या वाटेवरती
रोज एक नवा संघर्ष असतो
ऊन वारा चिंब भिजताना
कधीच सुखाचे जगणे नसते
एका चतकोर भाकरीसाठी
रोजची मर मर असते
खरचं…..
ऋतू हिरवा असला नसला तरी
कष्टकऱ्यांना कधीच नसतो सणवार उत्सव
मोल कष्टाचं मिळाल्यावरच असतो
रोज दिवाळी दसरा आणि
तोच महोत्सव
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९५७९११३५४७
९४२२८९२६१८


