गावकाका
आमचा गावकाका आणि भूमिका वगैरे.
>> माझी कंबर लचकल्याने गेले पंधरा-वीस दिवस मी माॅर्निंग वाॅक ला जाऊ शकलो नव्हतो. आज जरा बरे वाटू लागल्याने अगदी पहाटेच माॅर्निंग वाॅक ला गेलो असता आमच्या गावकाकाने मला पकडलेच. म्हणाला, “कोठी गेला होतास तं, पंधराक दिवस झाले, दिसलासच नाही ना?” आता आमच्या या गावकाकाच्या तावडीतून माझी सुटका नाही, हे जाणून मी थांबलो व काकाच्या बाजूलाच त्याच्या घरासमोरील धडीवर बैठक मारली.
>> काकाचे आजचे वय सुमारे 94-95 वर्षाचे असले तरी त्याचे दात, कान व डोळे शाबूत आहेत. तत्कालीन चौथीपर्यंत शिक्षण झाले असून आजही तो वर्तमान पत्र रोज वाचतो. अशाच वाचलेल्या काही बाबींवर माझ्यासोबत बहस करणे हा काकाचा खास शौकच. मी मनात समजून गेलो होतो की, काका आज पुन्हा काहीतरी अशाच एखाद्या विषयावर/बाबीवर माझ्यासोबत बहस करणार.

>> काकाने कोणतीही प्रस्तावना न करता सरळ विषयालाच हात घातला. म्हणाला, “मालं सांग, भूमिका अना सैद्धांतिक बैठक ह्या दोन बाबींमधी काही फरक आहे का दोन्हीचा अर्थ एकच आहे?” मी तर जरा गडबडलोच. पहाटे-पहाटेच आज काकाने जबरदस्त गुगली टाकली होती आणि मला खेळायला उद्युक्त करत होता. मी सावरून म्हणालो, “तुलं का वाटते तं काका?”
>> काका काही कच्चा खिलाडी थोडाच आहे. म्हणाला, “तू कथा, कविता, लेख लिवतंस, छापून बी येतंत, तुझ्या कथा, कविता अना लेख. तुलं तं मी काजक इचारता तो समजला असलंच. मंग काहालं कोंबडीवानी बेकारच इकडतिकड ईखरतंस. नसंल सांगावाचा तं नोको सांगूस, पर असा ईखर-वाखर काहालं करतंस.”
>> आता मला काकासमोर शरणागती पत्करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, हे माझ्या लक्षात आले. आणि मी म्हणालो, “तूच सांग ना काका, तुझ्या इचाराना याईतला फरक अना साम्य.” काका एकदम खुश झाला, माझी शरणागती पाहून. म्हणाला, “तुम्ही जरा जादा सिकलेपढले आहा मुनस्यारीच तुम्हाला शब्दाईचा कीस कसा काहाडावा हा चांगला समजते.
पर मी बी काही कच्च्या गुरुचा चेला नोहा. माझ्या गुरुजीना बी मालं चांगलाच सिकवलंन. आयेक – तूलं दाभण मंज्या काजक होय तं समजते ना?” मी म्हणालो, “समजते ना काका. सुतरीना पोते सिवालं दाभणच तं वापरावा लागते.” काका म्हणाला, “बरोबर ओरखलास. तं आता आयेक भूमिका अना सैद्धांतिक बैठक मंज्या काजक होते तं. ह्या दाभणीचा सुवट टोक मंज्या भूमिका अना दुसरा टोक, जेथी सुतरी ओवूनस्यारी पोते सिवतंत तो सिवणारा टोक मंज्या सैद्धांतिक बैठक होय असा समज. समजला काही?”
>> मी थोडावेळ गप्पच होऊन गेलो. आणि विषय बदलण्यासाठी म्हणालो, “बेसच मनलास काका, करता मी आता यावर इचार. तुझा उन्हाळी धान जमा करून झाला का? पानी-पानी होते ना गा! पान्यामंधी सापडला तं आफतच होयेल ना?” काका समजून गेला की, आता मला सटकायचे आहे. म्हणाला, “कायलं विषय बदलतंस. माझा मनना नाही पटला तं नाही पटला. पर इचार तं करसील? कर इचार! अना जा आता फिरावालं पहाडीकर.”
>> अर्थातच मी तेथून लगेच सटकलो.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(31 मे 2022)